‘विघ्नहर’चे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
चेअरमन सत्यशील शेरकर यांची माहिती
पुणे : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने आगामी २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामासाठी सुमारे ११ लाख मे. टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली.
गाळप हंगाम सन २०२३-२४ करिता मिल रोलरचे पूजन बुधवारी सर्व संचालक मंडळ सदस्यांचे उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाले, त्यानंतर चेअरमन बोलत होते.
यंदा पावसाळा लांबण्याची चिन्हे दिसत असली, तरी ऊस लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विघ्नहर कारखान्याची बेणे पुरविण्याची प्रक्रिया सुरु असून शेतकऱ्यांचा आडसाली ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
शेतकऱ्यांनी आडसाली उसाबरोबर पूर्वहंगामी व सुरु उसाची लागवडही मोठ्या प्रमाणात करावी, जेणेकरून ऊस तोडणीचे नियोजन योग्यप्रकारे करता येईल, त्याचप्रमाणे कारखान्यामार्फत हिरवळीचे खत म्हणून ताग बियाणाचेही वाटप सुरू आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शेरकर यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.
रोलर पूजन कार्यक्रमाला चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सर्व संचालक, कार्यकारी संचालक भास्कर घुले आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेरकर म्हणाले की, विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज आहे, त्याचबरोबर सहवीजनिर्मिती व डिस्टिलरी प्रकल्पांची कामेही वेगामध्ये सुरू आहेत. तसेच ६५ केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी विस्तारीकरण प्रकल्प पूर्ण झाला आहे.