विमल चौगुले, पोपट महाबरे, बावकर यांना राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘व्हीएसआय’च्या २०२२-२३ च्या पुरस्कारांची घोषणा

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) दिले जाणारे २०२२-२३ या सालच्या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. ऊस शेतीमध्ये नवे प्रयोग करून, विक्रमी उत्पादन घेणारे सौ. विमल चौगुले, श्री. पोपट महाबरे आणि अनिकेत बावकर हे राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.


सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा राज्यस्तरीय पुरस्कार कागल्या शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला असून, सहकारमंत्र्यांच्या भीमाशंकर सह. साखर कारखान्याला तीन पुरस्कार मिळाले आहेत.

शरद सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सौ. विमल लक्ष्मण चौगुले यांना पूर्वहंगामी गटात, पुणे जिल्ह्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी पोपट तुकाराम महाबरे यांना ‘सुरू हंगाम गटा’मध्ये; तर मुळशी (पुणे) तालुक्यातील कासारसाईचे संत तुकाराम सह. साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी अनिकेत हनुमंत बावकर यांना खोडवा गटात ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला..

व्हीएसआयचे उपाध्यक्ष व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व व्हीएसआयचे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांनी व्हीएसआयच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील, तांत्रिक सल्लागार आर. व्ही. दाणी (साखर तंत्र), डॉ. काकासाहेब कोंडे (मद्यार्क व जैवइंधन), राजेंद्र चांदगुडे (साखर अभियांत्रिकी) तसेच मृदा शास्त्रज्ञ डॉ. प्रीती देशमुख, डी. बी. घुले (मालमत्ता व्यवस्थापक), तुकाराम पाटील (प्रशासन विभाग), प्रकाश हापसे (जनसंपर्क विभाग) हे यावेळी उपस्थित होते.

व्हीएसआयची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. ११) सकाळी साडेदहा वाजता व्हीएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. श्री. पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या निमित्ताने त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय साखर उद्योग परिषदेचे आयोजन १२ ते १४ दरम्यान करण्यात आले आहे. जगातील सुमारे ४६ देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कारांमध्ये पूर्वहंगामी गटात को ८६०३२ वाणाचे हेक्टरी ३७१.४० टन उत्पादन घेणाऱ्या सौ. विमल चौगुले या कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील मजरेवाडीतील प्रगतिशील महिला शेतकरी आहेत. हातकणंगले येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या त्या सभासद आहेत. श्रीमती चौगुले यांना दहा हजारांचा कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे.

पुण्याच्या जुन्नर भागातील कुसुर गावचे शेतकरी पोपट महाबरे यांनी सुरू हंगामात को ८६०३२ वाणाचे हेक्टरी २१६.३५ टन उत्पादन घेतले आहे. त्यांना दहा हजारांचा कै. वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला आहे. ते जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. पुण्याच्या कासारसाई दारुब्रे येथे कोएम २६५ वाणाचे खोडव्यात हेक्टरी २९१.८१ टन उत्पादन घेणारे अनिकेत बावकर हे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. त्यांना दहा हजारांचा कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार मिळाला आहे.

व्हीएसआयकडून विभागीय ऊस भूषण पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांचीही घोषणा या वेळी करण्यात आली. स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दक्षिण विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतकऱ्यांची नावे अशी (उत्पादनाचे सर्व आकडे प्रतिहेक्टरी टनात) :

पूर्वहंगामासाठी प्रथम क्रमांक सुहास मधुकांत पाटील, मु.पो. सुर्ली, ता. कोरेगाव, जि. सातारा (उत्पादन- ३२९.२४, वाण- को ८६०३२, कारखाना-जयवंत शुगर्स लिमिटेड), सुरू हंगामासाठी हंगामासाठी यंदा एकही शेतकरी या विभागात पात्र ठरलेला नाही. खोडवा गटात प्रथम क्रमांक संभाजी रंगराव पाटील मु.पो. घोगाव, ता. पलूस, जि. सांगली (उत्पादन-२२१.३६, वाण- को ८६०३२ , कारखाना-राजारामबापू पाटील ससाका)

मध्य विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतकऱ्यांची नावे अशी ः पूर्वहंगामासाठी प्रथम क्रमांक विजय शिवलाल लोकरे, मु.पो. उजनी, ता. माढा, जि. सोलापूर, (उत्पादन- हेक्टरी ३१४.५८ टन, वाण- कोएम ०२६५, कारखाना-विठ्ठलराव शिंदे ससाका), सुरू हंगामात प्रथम क्रमांकासाठी सुनील गोविंद काकडे, मु.पो. काळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे (उत्पादन- २१५.३४, वाण- कोएम ०२६५, कारखाना- विघ्नहर ससाका). खोडवा गटात प्रथम क्रमांक सुरेश जालिंदर आवारे, मु.पो. पिंपळनेर, ता. माढा, जि. सोलापूर (उत्पादन- २३९.५२, वाण- कोएम ०२६५, कारखाना-विठ्ठलराव शिंदे ससाका)

उत्तरपूर्व विभागात हंगामनिहाय प्रथम आलेल्या शेतकऱ्यांची नावे अशी ः पूर्व व सुरू हंगामासाठी यंदा एकही शेतकरी या विभागात पात्र ठरलेला नाही. खोडवा हंगामासाठी प्रथम क्रमांक भैरवनाथ रघुनाथ सवासे, मु.पो. कासारजवळा, ता.जि. लातूर, (उत्पादन- हेक्टरी २१५.४० टन, वाण- को८६०३२, कारखाना-विलास ससाका)

कोल्हे कारखान्याला सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार
राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कारखान्याचा कै. वसंतदादा पाटील यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने मिळवला आहे. अडीच लाख रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एक लाख रुपये व मानचिन्ह असलेला कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याला मिळाला आहे.

कै. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या नावाने एक लाख रुपये व मानचिन्ह असलेला ऊस विकास व संवर्धनासाठीचा पुरस्कार कऱ्हाड (जि. सातारा) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा एक लाखाचा पुरस्कार दौंड (जि. पुणे) येथील दौंड शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याला मिळाला आहे.

कै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार एक लाखाचा असून, गगनबावडा (जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने पटकावला आहे. कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवानी पुरस्कार यंदा अकलूजच्या (जि. सोलापूर) सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याने मिळवला आहे.

सोनहिरा, भीमाशंकर, रेणाला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाची पुरस्कार
साखर कारखानदारीमध्ये उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. या गटासाठी दक्षिण विभागात डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने, तर मध्य विभागामध्ये आंबेगाव (जि. पुणे) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळवला आहे. उत्तरपूर्व विभागात रेणापूरच्या (जि. लातूर) रेणा सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार पटकावला. मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार
तांत्रिकदृष्ट्या उत्तम कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना व्हीएसआयकडून कार्यक्षमता पुरस्कार दिला जातो. यंदा दक्षिण विभागातून सांगलीच्या क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी कारखान्याला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. द्वितीय पुरस्कार कऱ्हाडच्या (जि. सातारा) जयवंत शुगर्स लिमिटेडला मिळाला आहे. तृतीय पुरस्कार सांगली जिल्ह्यातील विश्‍वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने मिळवला आहे.

मध्य विभागात तांत्रिक कार्यक्षमतेचा पहिला पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील आष्टी शुगर्स लिमिटेड यांना, द्वितीय पुरस्कार आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आणि तृतीय पुरस्कार सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याला मिळाला आहे. उत्तर पूर्व विभागात पहिल्या क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विभागून रेणापूर (जि. लातूर) येथील रेणा सहकारी कारखान्याला व लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे.

द्वितीय पुरस्कार लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख सहकारी कारखान्याला मिळाला आहे. तृतीय पुरस्कार विभागून हिंगोलीच्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याला व उस्मानाबाद जिल्ह्यातील नॅचरल शुगर्स अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड यांना जाहीर झाला आहे.

ऊस संवर्धनासाठी क्रांती अग्रणी, विठ्ठलराव शिंदे, समर्थचा गौरव होणार
ऊस विकास व संवर्धनात दक्षिण विभागात सांगलीच्या क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळवला. मध्य विभागात सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सरस ठरला. उत्तर पूर्व विभागात जालना जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याने पुरस्कार मिळवला.

वारे ठरले उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक
राज्याच्या साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचाही व्हीएसआयकडून विविध पुरस्कारांनी गौरव केला जातो. दहा हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे (बीड) दत्तात्रय मारुतराव वारे यांना यंदाचा उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक पुरस्कार जाहीर झाला आहे.

व्हीएसआयच्या इतर पुरस्काराची नावे अशी : उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी सौ. दीपा सुशिलकुमार भंडारे (श्री दत्त शेतकरी एसएसके, कोल्हापूर), उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर रवींद्र महादेव काकडे (कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग एसएसके, सोलापूर), उत्कृष्ट शेती अधिकारी प्रशांत भगवानराव कणसे (डॉ. पतंगराव कदम सोनहिरा एसएसके, सांगली),

उत्कृष्ट चीफ केमिस्ट किरण रामदास पाटील (क्रांती अग्रणी डॉ. डी. जी. बापू लाड एसएसके, सांगली), उत्कृष्ट चीफ इंजिनिअर सूर्यकांत काशिनाथ गोडसे (सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील एसएसके, सोलापूर), उत्कृष्ट कार्यकारी संचालक राजेंद्र नानासाहेब यादव (श्री सोमेश्‍वर एसएसके, पुणे).

व्हीएसआयमधील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून यंदा दीपक निलकंठ शितोळे (वरिष्ठ अभियंता, साखर अभियांत्रिकी विभाग, संजय अधिनाथ डवरी (डीटीपी ऑपरेटर, आर्ट अॅण्ड ग्राफिक्स विभाग, धनराज मधुकर मोहिते (लिपिक, लेखा विभाग) व मारुती शेषराव पांचाळ (कारपेंटर, इस्टेट सेक्शन) यांना घोषित झाले आहेत. दहा हजार रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »