‘व्हीएसआय’ साखर परिषद १२ जानेवारीपासून
पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत होत आहे. या निमित्ताने जगभरातील साखर क्षेत्रातील प्रगतीची अनुभूती मिळणार आहे. या काळात भव्य साखर प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे.
साखर उद्योगासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद व प्रदर्शन भरविण्याची पहिली संकल्पना व्हीएसआयचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडली होती. ‘व्हीएसआय’चे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांच्या उत्तम नियोजनातून यापूर्वीच्या दोन्ही साखर परिषदा यशस्वी झाल्या आहेत. त्यातून देशातील साखर उद्योगाला उपयुक्त माहिती मिळाली. तसेच साखर कारखान्यांमधील तांत्रिक व प्रशासकीय मनुष्यबळातील नेतृत्व फळीला जागतिक ज्ञानात अद्ययावत होण्यास मदत मिळाली आहे. साखर परिषदेच्या पूर्वतयारीचा आढावा श्री. पवार यांनी अलीकडेच घेतला. श्री. देशमुख यांच्यासह व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांच्याकडून सध्या या परिषदेचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे.
‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने व संधी’ या विषयावर होत असलेल्या या परिषदेच्या निमित्ताने व्हीएसआयच्या मांजरी फार्मवर एका भव्य प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. देशविदेशातील नावाजलेले शास्त्रज्ञ, तज्ज्ञ या परिषदेत साखर उद्योग व संलग्न क्षेत्रावर मते, निष्कर्ष मांडत सादरीकरणदेखील करणार आहेत.
परिषदेच्या निमित्ताने होत असलेल्या प्रदर्शनात जागतिक साखर उद्योगाच्या उभारणीतील सध्याची प्रगत उत्पादने, सेवा यांची माहिती मिळणार आहे. जगभरातील २०० पेक्षा जास्त सेवा पुरवठादारांना भेटण्याची संधी उद्योगातील प्रतिनिधींना मिळते आहे.