… आणि नऊ हजार रुपयांत मी झालो इंजिनिअर!
– वाळू रघुनाथ आहेर, नाशिक
(लेखक साखर उद्योगातील नामवंत सल्लागार आहेत.)
९९५८७८२९८२
(श्री. वा. र. आहेर यांनी त्यांच्या शैक्षणिक करिअरविषयी लिहिलेला हा लेख वाचनीय आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ‘शुगरटुडे’च्या वाचकांसाठी आम्ही प्रसिद्ध करत आहोत.)
मित्रहो, मे १९७४ च्या शेवटच्या सोमवारी इंटर सायन्स परिक्षेचा निकाल लागणार होता. मी सायन्स कॉलेज कोपरगावला मार्कशीट घेण्यासाठी गेलो तेव्हा हेडक्लॉर्क श्री. बिरंगळ सरांनी बोलावले. मला मार्कशीट दिले आणि माझे फर्स्ट क्लास मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
मला इंजिनिअरींगला प्रवेश मिळेल असे ठासून सांगितले.तेथील खर्चाचा विषय काढल्यावर स्कॉलरशीप मिळेल असे सांगून माझे समाधान केले. माझ्या हातात इंजिनिअरींगचा प्रवेश अर्ज दिला आणि पुढील सोमवारी प्रवेश अर्ज पुर्णपणे भरून सोबत मार्कशीट, जन्मतारखेचा दाखला,उत्पन्नाचा दाखला इत्यादी माहितीसह आवर्जून पोहोच करावयास सांगितले.
कारण पुढच्या मंगळवारी कॉलेजचा क्लॉर्क १५-२० विद्यार्थ्यांचे अर्ज घेऊन पुण्यास इंजिनिअरींग कॉलेजला जाणार आहे असे सांगितले . मी प्रवेशअर्ज घेऊन संध्याकाळपर्यंत गावी मुखेडला आलो. ४-५ दिवसात गावचे सरपंच, तलाठी आणि हेडसर यांचेकडून तयार करून विविध दाखले घेतले. प्रवेशअर्ज इंग्लीशमध्ये पेन्सिलने भरून हेडसरांकडून तपासल्यावर नंतर पेनने पूर्ण केला. ठरल्याप्रमाणे सोमवारी सायन्स कॉलेज कोपरगावला जाऊन हेडक्लॉर्क श्री.बिरंगळ सरांना प्रवेश अर्ज आणि विविध दाखले पोहोच केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात इंजिनिअरींग कॉलेज पुणे यांचे मला इंजिनिअरींगला प्रवेशासाठी मुलाखतीला बोलावल्याचे पत्र आले.
माझ्या मनामध्ये घरच्या गरीब परिस्थितीमुळे प्रश्नाची नवी मालिका सुरू झाली. तालूक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या दाखल्यासाठी कोण मदत करेल, ४ वर्षे शिक्षणासाठी कोण मदत करील, यासाठी श्री. संपतराव पा. आहेर आणि इतर जवळच्यांशी चर्चा केली पण फक्त संपतराव पा.आहेर यांनी मदतीचे आश्वसन दिले. त्याप्रमाणे कुसूरचे मामा श्री. भास्करराव गायकवाड यांनी -प्रथम वर्ग न्यायाधीशांकडून चांगल्या वर्तणूकीचा दाखला, तहसिलदारांकडून डोमेसिल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला, मेडीकल ऑफिसरकडून फीटनेस सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी मोलाची मदत केली.
आईवडीलांनी येसगावच्या काकांना भेटण्यास पाठविले. माझे काका श्री. राहाणे पाटील येसगावला आ. कोल्हे साहेबांच्या वस्तीवर राहायचे. मी पोहचल्यावर मला इंजिनिअरींगला प्रवेशासाठी मुलाखतीला बोलावल्याचे पत्र आले, हे समजल्यावर सर्वांनी आनंद व्यक्त केला. आ. कोल्हे साहेबांचे बंधु श्री. दत्तुनाना कोल्हे यांनी काकांना इंजिनिअरचे महत्व समजून सांगितले आणि मला इंजिनिअरींगला प्रवेशासाठी मदत करण्याचे काकांना बजावले. मावशी आणि काकांचा माझ्यावर जीव होता. त्यामूळे चांगला हूरूप आला. कोपरगावात माझे वर्गमित्र श्री.रविंद्र नरोडे यांनाही इंजिनिअरींगला प्रवेशासाठी मुलाखतीला बोलावल्याचे पत्र आले होते. त्यांना भेटून पुण्याला जाण्याचा दिवस नक्की केला. त्यांचे वडील श्री. लक्ष्मणराव नरोडे सोबत येणार होते.
अशाप्रकारे प्राथमिक तयारी गावी करून सकाळी येसगावला काकांकडे पोहचलो. दिवसासाठी पुण्याला उद्या पहाटे जायचे म्हणून काकांनी संध्याकाळी कोपरगावला सायकलवरून नरोडेंच्या घरी मुक्कामाला सोडले.
भल्या पहाटे ४ वाजता आम्ही तिघे रविंद्र, लक्ष्मणराव आणि मी कोपरगांव पुणे बसने निघालो. १०.३० ला पुण्याला पोहचलो. वेळेवर ११ वाजता इंजिनिअरींग कॉलेजला पोहचलो. दोघांनी सर्व कागदपत्रे सादर केली आणि प्रवेश फीचे पैसे भरून पावती घेतली.
कॉलेज १५ जून १९७४ रोजी सुरू होणार आहे आणि होस्टेल प्रवेशाची यादी बोर्डावर लावणार आहे, असे कळले. आम्ही एका नव्या पर्वात प्रवेश केला. बराच उशीर झाला होता. रविंद्रचे मेव्हणे प्राध्यापक श्री. शिवाजीराव उगले यांचेकडे पीएमटी बसने औंधला मुक्कामाला पोहचलो. त्यांचेकडे मुक्कामात पुण्याची आणि इंजिनिअरींग कॉलेजची प्राथमिक माहिती मिळाली. दुसरे दिवशी सावकाश कोपरगावला बसने आलो. पुन्हा १४ तारखेस सकाळी बरोबर पुण्यास बसने जायचे ठरविले.
मी चर्चा विचारणा करण्यासाठी येसगावहून मुखेडला आलो. आता माझी कपड्यांची जुळवाजुळव सुरू केली. बेड, दोन जोडी कपडे आणि असे सर्व जुने सामान एक पत्र्याची पेटीत जमा केले. आमचे चुलत बधुं श्री. संपतराव पा. आहेर यांना भेटल्यावर त्यांनी २५० रूपये देवून दिवाळीला आणखी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर १२ तारखेला येसगावला काकांकडे पोहचलो. माझी सर्व इंजिनिअरींग कॉलेजची तयारी माझे मित्र श्री. नितीन कोल्हे आणि त्यांचे कुटूंबीय यांना सांगितले. श्री. दत्तुनाना कोल्हे यांनी होस्टेल मिळेपर्यंत राहण्याची सोय म्हणून कॅप्टन श्री. पी. आर. शिंदे यांचा औंध पोस्टचा पत्ता दिला. नंतर काकांनी ३०० रूपये मला दिले. सर्वांचे आशीर्वाद घेऊन १४ तारखेस आम्ही तिघे रविंद्र, लक्ष्मणराव आणि मी कोपरगांव पुणे बसने पुण्यास निघालो.
पुण्यास पोहचल्यावर पीएमटी बसने ते औंधला उतरले आणि मी औंधपोस्टला गेटवर उतरून कॅप्टन श्री. शिंदे सरांचा पत्ता विचारत त्यांचेकडे पोहचलो. कॅप्टनसाहेबांना दत्तुनाना कोल्हे यांचा निरोप सांगितला. कॅप्टनसाहेबांनी माझे स्वागत करून इंजिनिअरींगला प्रवेशमिळाल्याबद्दल अभिनंदन केले. होस्टेल मिळेपर्यंत इथेच राहण्याचा आग्रह धरला. ते सीओईपीत इंजिनिअर झाले असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी जाणून होते. त्यांचेसमवेत बोलून सर्व शीण गेला.
१५ तारखेला बसने कॉलेजला जाऊन रोल नं. टाईमटेबल नोंद केले. होस्टेल प्रवेशाच्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये माझे नाव नव्हते. दुसरी लिस्ट ८ दिवसाने लागेल असे समजले. सांयकाळी कॉलेज सुटल्यावर औंधपोस्टला कॅप्टनसाहेबांकडे गेलो. त्यांनी होस्टेल मिळेल असा आशावाद व्यक्त केला. दरम्यान कॅप्टनसाहेबांनी जेवण्यासाठी मेस प्रवेशासाठी विद्यार्थी सहायक समिती पुणे य़ांना पत्र दिले. ते पत्र घेऊन समिती ऑफीसमध्ये जाऊन एक महिन्याचे डिपॅझिट भरून फर्ग्युसन कॉलेज कँप्स मधील मेसमध्ये दाखल झालो. कॅप्टनसाहेबांचे संध्याकाळी आभार मानले. कॉलेजमध्ये नरोडे आणि तर कोपरगावच्या कॉलेजमित्रांची ओळख झाली.
सोमवारी लागलेल्या होस्टेल प्रवेशाच्या दुसरे मेरिट लिस्टमध्ये माझे नाव होते. रवी नरोडे आणि मी सोबतच होस्टेलमध्ये जाऊन होस्टेल फी भरून रूम ताब्यात घेतली. नरोडे आणि मी पार्टनर झालो. कॅप्टनसाहेबांनी होस्टेलमध्ये त्यांचे नातेवाईक नारायण डावखर सेकडं ईयरला होते. त्यांना पुस्तके मला देण्यास सांगून माझा आर्थिक भार हलका केला.
होस्टेलमध्ये रूमवर दुसरे दिवशी कॅप्टनसाहेबांचा निरोप घेऊन दाखल झालो. नवीन ठिकाणी सुरूवातीला बुजल्यासारखे झाले.ग्रामीण भागातून आल्यामुळे काही नवीन गोष्टी समजण्यास वेळ लागत होता,अडचणी येत होत्या.जेवणासाठीची फर्ग्युसन कॉलेज कँप्स मधील मेस बरीच दुरवर असल्याने पायपीट करावी लागणार होती.
प्रथम वर्षाला लागणारे ड्राईंग बोर्ड, मिनी ड्रॉफ्टर, वर्कशॅप टूल, स्लाईड रूल ,जर्नल ,जॉमेट्री बॉक्स घेणे आवशक होते. जवळपास सर्व सामान सेकंडहँड मिळाल्याने बरीच बचत झाली. यथावकाश होस्टेलमधील प्रथम वर्षाच्या मुलांल्या ओळखी झाल्या. त्यात रेगे, नरोडे, थोरात, लोखंडे, पाटील, मोरे, अभ्यंकर, जाधव, चौधरी, पवार, कुलकर्णी, गांगुर्डे, मरकळे, बोंडे, परदेशी, एकबोटे, डाके, दुरूगकर, म्हात्रे, सुराणा, अगरवाल हे प्रामुख्याने होते. होस्टेलमध्ये सिनिअर मुलांना मान देऊन अदबशीरपणे वागण्याचा रिवाज आहे. कॉलेजमध्ये श्री. व्ही. डी. कराड सर, डी.डी. दराडे सर, सांवत सर, देशपांडे सर, नवले सर, भंडारी सर, डी..के.. जोशी सर, खाडीलकर सर, यांच्यासारखे आणखी विद्वान सर भेटले.
विद्यार्थी,कॉलेज आणि होस्टेलमध्ये अप्रत्यक्षरित्या शहरी-ग्रामीण तसेच, नासिक, नगर, खानदेश अशा प्रकारच्या विभागलेले दिसले. कॉलेजात मासिक परीक्षा प्रत्येक शनिवारी दोन विषयांची टेस्ट होत असल्यामुळे लवकरच अभ्यासाचे रूटीन सुरू झाले. वर्कशॉप प्रॅक्टीकल, ड्रॉईग प्रॅक्टीकल, सर्वे प्रॅक्टीकल यात दिवस जात होते. रविवारी कपडे धुणे, इस्री करणे, ओळखीच्या भेटीगाठी घेणे यातच जायचा. कॉलेजात सरकारी स्कॉलरशिप नुतनीकरणास अर्ज भरून दिले. तसेच मी डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीच्या लोन स्कॉलरशिपचेही फॉर्मभरले. अशा रितीने फर्स्ट टर्म संपून परिक्षेनंतर दिवाळीची सुट्टी लागली.
सेकंड टर्मला मला माझे काका आणि संपतराव आहेर यांनी मिळून ६००रू दिले. कोल्हेसाहेबांकडून ड्रेस मिळाला. सोबत माझेमावसभाऊ कारभारी राहाणे पुण्याला आले. त्यांचे ओळखीचे नाटेगावची मोरे फॅमिली बालगंधर्व चौकात राहात. त्यांची ओळख करून दिली आणि माझी भोजन व्यवस्था मोरे फॅमिलीत दरमहा ४५ रूपये प्रमाणे केली. माझा जेवणासाठीचा फर्ग्युसन कॉलेज कँप्स मधील मेसचा फेरा वाचला.
तेव्हा मला दरवर्षीच्या खर्चाचे नियोजन कळत नव्हते, पण आज मी त्याचा तपशील देतो. ४ वर्षाचा खर्च आणि मदत साधारणपणे असा आहे. आजमितीला ही किरकोळ वाटणारी रक्कम त्याकाळात अनमोल अशीच होती.
- १) काका श्री.राहाणे पाटील- रू.२०००
- २) संपतराव आहेर- रू.२०००
- ३) नॅशनल स्कॉलरशीप रू.३८७०
- ४) डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीच्या लोन स्कॉलरशिप- रू.८००
- ५) संजीवनी साखर कारखाना ट्रेनिंग एकुणअनुदान- रू.४००
- ६) एकूण खर्च- रू.९०००
असा हा चार वर्षाचा प्रवास खुप मोलाचा अनुभव देऊन गेला. ऑगष्ट १९७८ मध्ये बी. ई.चा रिझल्ट लागला. मी चांगल्या मार्काने पास झालो. सर्वांना खुप आंनद झाला. आ. कोल्हे साहेबांची भेट घेतल्यावर त्यांनी संजीवनी साखर कारखान्यात अप्रेंटीस इंजिनिअर म्हणून नोकरी दिली. असा हा माझा इंजिनिअर होण्याचा प्रवास झाला.
‘शुगरटुडे’चे आवाहन
साखर उद्योग क्षेत्रामध्ये साहित्यिक प्रतिभा असणाऱ्या व्यक्तींची कमी नाही. श्री. आहेर, श्री. भास्कर घुले आदींनी ‘शुगरटुडे’साठी तांत्रिक विषयाखेरीज चांगली साहित्यिक भर घातली आहे. अशा मान्यवरांच्या लेखनाचे आम्ही स्वागत करतो. आपण लिहावे, ‘शुगरटुडे’ त्यास प्रिंट आणि डिजिटल आवृत्तीत प्रसिद्धी देईल. शब्द मर्यादा एक हजारांपर्यंत असावी. ईमेल – sugartodayinfo@gmail.com आणि व्हॉट्सअप संदेशासाठी क्रमांक – ८९९९७७६७२१