म्हणूनच मी लिहायला बसतो आहे!

दु:खाचे उमाळे शब्दात घ्यायचे आहे|
सोसलं आहे ते व्यक्त करायचे आहे||
ज्या काळरात्रींनी माझी झोप नेलीआहे|
त्या रात्रींचे गुढ मला सांगायचे आहे ||
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे||१||
बालपणी फुटक्या पाटीचे स्वप्न होते|
तेच आता सत्यात उतरायचे आहे||
बेरंग झालेल्या रात्री जे मनात होते|
त्या रंगातून इंद्रधनुष्य बघायचे||
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे ||२||
त्या आर्त आवाजातली जी लकेर होती|
त्यातून नवी गझल लिहायची आहे||
उसासे टाकत जे आम्ही सहन केले|
ती माझी कहाणी मला सांगायचीआहे||
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे ||३||
जे शब्द दुनियेला ओझे वाटत होते|
तेच शब्द मला आज ताकद देतील||
प्रत्येक पराजयातून उभा राहिलो|
त्या क्षणांना कवितेत बघायचं आहे||
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे||४||
अंधारातून मला जे प्रश्न विचारले |
त्या प्रश्नांवर प्रकाश टाकायचा आहे||
प्रत्येक वेळी जखम रक्ताने वाहिली |
त्याचा एकच प्रबंध लिहायचा आहे||
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे||५||
ज्या मार्गाने जाण्यापासून मला रोखले|
त्यावर पाऊलखुणा रोवायच्या आहे||
मी कोणी श्रीज्ञानेश्वर, तुकाराम नाही|
स्वतःशी लढून सन्मानाने जगायचं||
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे||६||
माझ्या आवाजाने आकाशात झेप घ्यावी|
त्यासाठी मजबूत पंख पाहिजे आहे ||
खूप टीका टिप्पणी सहन केली आहे |
त्या सहनशीलतेतून आवाज येईल ||
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे||७||
जे सालोसाल मनात दडलेले आहे|
तेच मला कवितेत लिहायचे आहे||
खोटेपणा त्यात लवलेशही नसेल|
खरेपणाची दौतीची शाई वापरेल||
आणि माझ्या मनाची मन:शांती शोधेल|
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे||८||
मी जरी इकडच्या गावी नवीन आहे|
तरीपण माझ्या भावना जुन्याच आहे||
कवी लेखकाला मनीअंतरात्मा आहे|
कवितेत सत्य उतरावयाचे आहे|
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे||९||
प्रत्येक अश्रूंची कविता लिहितो आहे|
दु:ख दारिद्र्य नाशासाठी लिहितो आहे||
गोरगरीबांच्या भल्यासाठी लिहितो आहे|
आता देशाच्या हितासाठी लिहितो आहे||
म्हणूनच मी लिहायला बसतो आहे||१०||
रचनाकार: आहेर वाळू रघुनाथ, नाशिक