मी आहे वेठबिगार
करतो जोहार मायबाप, जोहार।
मी आहे तुमच्या घरचा वेठबिगार ।
तुमच्या ऊष्ट्या खरकट्याचा वारसदार।
दुष्काळात बापानं कर्ज घेतलं हजार ।।
अन दम्याच्या आजारानं बाप गेला वर।
माझी रवानगी झाली शेठच्या घरा ।।
पहाटे शेणगोठा, चारापाणी दुधधारा ।
सकाळीच पाणी वाहि खेपा बारा ।।
दिसभरं धावे मालकाचे घोड्यापुढे।
तोब-याला मागे अन लगामाला पुढे।।
मालकाचे शिव्याशाप दिवसभर ।
आणखी वर आईबापाचा उध्दार।।
मगं नशिबी कोरडी मीठभाकर।
रातभर आम्ही होतो राखणदार ।।
फाटकी बंडी अन फाटकंच धोतरं ।
बिस्तराच्या गोधडीची झाली लक्तरं।।
आहे मी शांत आणि सहनशील।
परि आतून आहे पेटती मशाल।।
मी शिकलो नाही शाळा।
राहिलो आडाणीच गोळा।।
देवा दे मला तुझा थोडाफार आधार।
कारण मी आहे तुमचा वेठबिगार ।।
रचनाकार : आहेर वा.र. (नासिक) 9958782982
कवी साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत सल्लागार आहेत.