‘निरा-भीमा’च्या सर्वसाधारण सभेत राजकीय रंगच अधिक
पुणे : निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेत राजकीय रंगामुळेच अधिक गाजली. त्यामुळे कारखान्याबाबत कमी आणि अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत सभास्थळी अधिक कुजबूज दिसून आली. काहींनी आता ‘तुतारी वाजवा’ अशी गळही पाटील यांना घातली.
निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वावर सभासदांची असलेली निष्ठा व सहकार्य हे गेल्या २६ वर्षांपासून कायम आहे. कारखान्याने स्थापनेपासून विविध अडचणींवर मात करीत प्रगती साधली आहे. त्यामुळे चिंता करू नका, कारखान्याला गतवैभव निश्चितपणे प्राप्त करू, असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे सोमवारी (दि. २३) निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली
पितृपंधरवडा जाऊ द्या
‘भाऊंनी तुतारी हातात घ्यावी’, अशी मागणी करण्यात आल्यानंतर, ‘इंदापूर तालुक्यातील जनतेच्या मनात आहे तोच निर्णय विधानसभेसाठी घेतला जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. त्यावर काही कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करताच हर्षवर्धन पाटील यांनी पितृपंधरवडा जाऊ द्या, असे सांगितले. त्यानंतर एका वयोवृद्ध सभासदाने उभे राहत ‘भाऊ, तुम्ही तुतारी घ्या,’ अशी मागणी केली.
पाटील म्हणाले, सहकारामध्ये दूरदृष्टीचा विचार महत्त्वाचा असतो. कारखान्यामुळे या परिसराचा विकास व प्रगती झाली आहे. गत सन २०२३-२४ च्या हंगामात उसाचे गाळप कमी झाले, त्यामुळे उत्पादन खर्च वाढला तसेच कमी वयाच्या उसाचे गाळप झाल्याने साखर उतारा कमी आला. त्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी झाले. परिणामी या हंगामामध्ये कारखान्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आगामी काळात कारखान्यास गुणवत्तेचा ऊस देऊन सहकार्य करावे. साखरेची एमएसपी व इथेनॉलच्या दरवाढीसंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. संस्था चालविताना अनेक अडचणी येत आहेत, संस्था उभारून चालविणे सोपे नसते. तालुक्याच्या विकासासाठी भाऊंना साथ द्या, असे आवाहन कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले. श्रद्धांजली ठराव कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मांडला. तसेच शेटफळ हवेली तलाव भरून घेतल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अहवालवाचन प्र-कार्यकारी संचालक सुधीर गंगे पाटील यांनी केले, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी आभार मानले.
सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, दत्तात्रय शिर्के, अनिल पाटील, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, विकास पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिद्र वीर, भागवत गोरे, प्रसाद पाटील, चंद्रकांत भोसले, राजकुमार जाधव, तानाजी नाईक, दत्तात्रय पोळ इ. उपस्थित होते.