सांगलीतील कारखाने बंद पाडण्याचा इशारा

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक शंभर रुपये असा दर द्यायला हवा. जे कारखानदार हा दर देणार नाहीत, असे साखर कारखाने बंद पाडल्याशिवाय आम्ही राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. बुधगाव (ता. मिरज) येथे शनिवारी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. बुधगाव गावभागातील दत्त मंदिराच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी ऊस दर आणि शक्तिपीठ महामार्ग याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेला प्रमुख वक्ते म्हणून राजू शेट्टी यांच्यासह माजी खासदार संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख महेश खराडे, शेतकरी युवा नेते संदीप राजोबा, संजय बेले माजी पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राजू शेट्टी यावेळी म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना दर द्यायला परवडतो, मग सांगली जिल्ह्यात काय अडचण आहे? सांगलीमध्येही ३४०० च्या वर रिकव्हरी असणाऱ्या कारखान्याने एफआरपी अधिक शंभर रुपये असा दर द्यायला हवा अन्यथा आम्ही सांगली जिल्ह्यातील कारखाने बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. नागपूर-रत्नागिरी हा महामार्ग सहा किंवा आठपदरी करा, त्यातील मधले दोन मार्ग एक्स्प्रेस हायवेच्या धर्तीवर तयार करा. याच महामार्गाचे टोलचे पैसे अपेक्षेप्रमाणे वसूल होत नसताना, पुन्हा दुसरा महामार्ग कशासाठी करता, असा प्रश्नही शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ः संजय पाटील
माजी खासदार संजय पाटील म्हणाले, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. शासनामधील ज्यांच्याकडे जी जबाबदारी आहे, ती पार पाडत असल्याने त्याचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. बँकांनी शासनाकडून येणारी मदत शेतकऱ्यांच्या कर्जाला भरून घेऊ नये. सात-बारा कोरा करा.






