साखर उद्योगाला भाऊंनी दिलेल्या आश्वासनांचे काय होणार?
पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची धुरा सांभाळल्यापासून धडाकेबाजपणे काम सुरू केले होते, त्यांच्या रूपाने आपले अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा सहकारी साखर उद्योगाला वाटत होती, मात्र त्यांनी पुन्हा पक्षांतर केले आणि आशांचे निराशांमध्ये रूपांतर झाले. हर्षवर्धन पाटील ऊर्फ भाऊंना पक्षच सोडायचा होता, तर त्यांनी साखर महासंघाचे अध्यक्षपद आणि एनसीडीसीचे संचालकपद का स्वीकारले, असा प्रश्न त्यांच्या ताज्या निर्णयामुळे उपस्थित झाला आहे.
ऑगस्ट महिन्यात भाऊंनी साखर संघाचा मोठा, दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी आवर्जून हजेरी लावली होती व पाटलांवर टाकलेला विश्वास ते सार्थ ठरवतील, असे भाकीत केले होते. मात्र ते भाकीत खोटे ठरले आहे. या कार्यक्रमात भाऊंनी साखर उद्योगाला अनेक आश्वासने आणि वचने दिली. (भाषणाची लिंक सोबत दिली आहे, ती आवर्जून ऐका :https://www.youtube.com/watch?v=i73Gl7dKrSk , https://www.youtube.com/watch?v=47ipewKWa4s , https://www.youtube.com/watch?v=EArW59sVxH0) येत्या दहा वर्षांचा रोडमॅप कसा असेल, याची झलक त्यांनी दाखवून दिली होती.
एका नेत्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, भाऊ गेल्या दहा वर्षांपासून कायम संभ्रमात आहेत. त्यांना नेमकं काय करायचं हे समजत नाही. त्यामुळे ते सारखे पक्ष बदलत असतात. भविष्यात अनेक मोठी पदे खुणावत असताना त्यांचा जीव आमदारकीतच अडकलेला दिसतो. कधी एकदा आमदार होतो, असे त्यांना वाटत आहे.
अनेक पत्रकार दिल्लीच्या कार्यक्रमाला होते, यावेळी भाऊ हरवल्यासारखे भासायचे. त्यांचे शरीर कार्यक्रमात होते, मात्र मन मध्येच कुठे तरी भराऱ्या घेऊन परत येत होते, असे दिसायचे. २२ ऑगस्टला त्यांचा वाढदिवस झाला. त्यानंतर २४ आणि २५ ऑगस्टला डीएसटीएचे वार्षिक अधिवशेन होते, त्याच्या उद्घाटनप्रसंगीदेखील भाऊंनी पुन्हा आश्वासने दिली. सप्टेंबरमध्ये इथेनॉल बंदीबाबत केंद्राचा निर्णय झाल्यानंतर, तातडीने स्वत: व्हिडिओ प्रतिक्रिया देणारे भाऊ पहिले होते. त्यांनी त्यावेळीही साखर उद्योगाच्या पुढील दिशेची उजळणी केली. मात्र त्यांची स्वत:ची दिशा दुसरीकडेच होती हे त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दिसून आले.
राजकारणात कुणी कुठे जावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र तुम्ही जेथे आहात तेथील मानाच्या पदावर शेवटच्या दिवसापर्यंत सक्रिय राहून निर्णय प्रक़्रियेत भाग घेता हे बरोबर नाही. एखाद्याच्या मनात वेगळे काही चालले असेल, तर त्याने स्वत:ला बाजूला ठेवणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरले, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ पत्रकाराने व्यक्त केली.
भाजप नेत्याने सांगितले की, साखर उद्योगाला उभारी देण्याचा विडा आमच्या पक्षाने उचलला आहे, त्यामुळे भविष्यात सकारात्मक निर्णय होतच राहतील. कोण कुठे गेले म्हणून निर्णय प्रक्रियेत खंड पडणार नाही, काही दिवसांचा ब्रेक लागेल एवढेच.
भाऊंनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे, मात्र अद्याप साखर महासंघाच्या अध्यक्षपदाचा रीतसर राजीनामा दिलेला नाही. तो काही दिवसांत देतील किंवा देणारही नाहीत, अशी शक्यता आहे. कारण महासंघ ही स्वतंत्र संस्था आहे, त्यावर केंद्र सरकारचे कधीच थेट किंवा कायदेशीर नियंत्रण असण्याचा प्रश्नच येत नाही. ते महासंघाच्या अध्यक्षपदी राहिले तरी त्यांना केंद्र सरकारचे पूर्वीसारखे सहकार्य मिळणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.