कोण आहेत साखर कारखानदार, खासदार बजरंग सोनवणे ऊर्फ बप्पा
बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. येथून विजयी झालेले ५३ वर्षांचे बजरंग मनोहर सोनवणे ऊर्फ बप्पा हे साखर उद्योजक आणि दुग्ध व्यावसायिक आहेत. येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट्स लि., येडेश्वरी मिल्क प्रॉडक्ट्स लि. आणि संकल्प ग्रीन पॉवर लि. या तीन कंपन्यांचे प्रवर्तक आहेत. या तिन्ही कंपन्यांवर त्यांच्या परिवारातील सदस्यच संचालक किंवा डायरेक्टर आहेत. तसेच देवधानोरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि, एस.एस. इंटरनॅशनल ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. यावरही ते संचालक आहेत.
येडेश्वरी ॲग्रो ही त्यांची सर्वात जुनी कंपनी आहे. ती २००७ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. सुरुवातीपासून ते स्वत: आणि त्यांची सुविद्य पत्नी सारिका सोनवणे हे दोघेही कंपनीचे संचालक आहेत. २०२३ मध्ये त्यांची मुले गौरव, हर्षदा आणि सौरव यांचीही या कंपनीवर डायरेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
आधी दुग्ध व्यवसायात जम बसवल्यानंतर, बप्पांनी साखर उद्योगात पाऊल टाकले आणि केज तालुक्यात पहिला साखर कारखाना सुरू केला. त्याची क्षमता सध्या ६५०० टीसीडी आहे. तसेच बार्शीजवळ आर्यन शुगर हा २५०० टीसीडीचा दुसरा कारखाना त्यांनी सुरू केला. संकल्प ग्रीन एनर्जी २०१६ ला सुरू करण्यात आली आहे, तिचे कार्यालय मात्र सोलापुरात आहे. दहा वर्षांपासून ते साखर कारखानदारी उत्तमपणे चालवतात. त्यांची ट्रेडिंग कंपनी २०२० मध्ये सुरू करण्यात आली आहे.
वार्षिक उत्पन्न
२०२४ च्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार, बप्पांचे वार्षिक उत्पन्न ३ कोटी ३६ लाख आहे. ते त्यांनी २०२२-२३ आर्थिक वर्षात दाखल केलेल्या आयकर विवरण पत्रात नमूद केले आहे. २०१७ – १८ च्या विवरणपत्रात ते ४३ लाख ८२ हजार एवढे नमूद केले होते. म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न पाच वर्षांमध्ये सुमारे आठ पटींनी वाढले आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत अजितदादांसोबत म्हणणारे बप्पा….
बजरंग ऊर्फ बप्पा यांचे मूळ गाव केज तालुक्यातील सारणी (आनंदगाव) आहे. ते या गावच्या सरपंच राहिले आहेत. आधी सध्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जात. बप्पांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू झाली. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्षही राहिले आहेत. त्यांची डॉक्टर मुलगी हर्षदा २०२२ मध्ये केज नगर पंचायत निवडणुकीत उभी होती. मात्र तिचा पराभव झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बप्पांनी राजकीय भूमिका जाहीर केली होती.
एखाद्या पराभवाने खचणारी बजरंग सोनवणेची औलाद नाही, आम्ही यापुढेही निवडणुका लढवत राहणार, असे ते जाहीरपणे म्हणाले.
याच पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि शेवटचा श्वास असेपर्यंत मी अजितदारांची साथ सोडणार नाही. ते २० मार्च २०२४ पर्यंत अजितदादांसोबतच होते. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना बीडमधून लढण्याची ऑफर दिली आणि त्यांनी २० मार्च रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र पाठवून पक्षाचा राजीनामा दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपच्या मातब्बर उमेदवार पंकजा मुंडे यांचा त्यांनी सहा हजारांवरून अधिक मतांनी पराभव केला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बीडमधून उभे होते. मात्र पंकजा यांच्या छोट्या भगिनी, भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडून त्यांचा सुमारे पावणेदोन लाख मतांनी पराभव झाला होता. यावेळी मात्र त्यांचे स्टार उत्तम राहिले आणि थोड्या मतांनी का असेना एक साखर कारखानदार बीडचा खासदार झाला. त्यांचे दोन्ही साखर कारखाने खासगी आहेत. आर्यन शुगर माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सुरू केला होता. मात्र तो बंद पडल्यानंतर २०२२ मध्ये सोनवणेंनी तो लिलावात विकत घेतला. पंकजा आणि प्रीतम या भगिनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका आहेत. हा कारखाना सध्या बंद आहे.
बप्पांच्या पत्नी सारिका यांनीही बीडमधून तीन अर्ज दाखल केले होते; परंतु दोन अर्ज फेटाळण्यात आले, तर एक अर्ज त्यांनी मागे घेतला.
चंदनचोर…
बजरंग सोनवणे यांच्यावर ‘चंदनचोर’ असा आरोप केला जातो. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अत्यंत खिलाडू वृत्तीने त्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘माझी बायकोही विचारते मला की आपणास चंदनचोर का म्हणतात.?’ हा विनाकारण आरोप करण्यात येतो. मात्र त्यामुळे मला काही फरक पडत नाही. ते एक बिरुद आहे, असे मी मानतो.
बप्पांना नाही स्वत:ची शेतजमीन
सोनवणे यांनी २०२४ च्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे स्वत:ची शेतजमीन नाही. त्यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नी सारिका यांच्या नावावर मात्र २३ एकर जमीन आहे, तर मुले आणि अन्य अविभक्त कुटुंब सदस्यांच्या नावे १०७ एकर जमीन आहे. सारिका या बी.एस्सी. बी.पी.एड आहेत. प्रतिज्ञापत्रात शिक्षणाचे वर्ष नमूद करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे; परंतु सौ. सारिका यांच्या प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख केलेला नाही.
बप्पांच्या प्रतिज्ञापत्रात कला पदवीधर (२०१४) असा उल्लेख आहे. याचा अर्थ अर्धवट राहिलेले शिक्षण त्यांनी खूप उशिरा पूर्ण केलेले दिसते. विशेष म्हणजे या पती-पत्नीवर एकही गुन्हा दाखल नाही.
शेतकरीपुत्र असणाऱ्या बप्पांनी स्वत:च्या नावे शेतजमीन ठेवलेली नाही. असे असले तरी त्यांची एकूण मालमत्ता सुमारे ३६ कोटींच्या घरात आहे. त्यात पुण्यातील साडेनऊ कोटी मूल्याच्या बंगल्यासह येडेश्वरी ग्रुपचे साडेतीन कोटींचे शेअर आदींचा समावेश आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर याच ग्रुपचे सुमारे सव्वा कोटींचे शेअर आहेत. त्यांच्या नावावर एकही कार नाही; मात्र एक टँकर, चार ट्रॅक्टर आणि एक हार्वेस्टर आहे. तर पत्नीच्या नावे एक हुंडाई क्रेटा गाडी, दोन ट्रॅक्टर आणि एक हार्वेस्टर आहे.
दिल्लीच्या राजकारणात यापूर्वी अनेक साखर कारखानदारांनी प्रतिनिधित्व केले आहे; परंतु ते बहुतांशी सहकारी साखर कारखानदारीशी संबंधित होते. त्यांचा पिंड सहकाराचा होता. आता बप्पा यांच्या रूपाने अस्सल साखर कारखानदार लोकसभेत गेला आहे. ते देशाच्या सर्वोच्च सभागृहात साखर उद्योगाचे प्रतिनिधित्व कसे करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
………
धैर्यशील मोहिते
साखर कारखानदारीतून पुढे आलेले आणखी एक घराणे म्हणजे अकलूजचे मोहिते पाटील. सहकारमहर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू आणि राजसिंह मोहिते यांचे चिरंजीव धैर्यशील मोहिते पाटील हे माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार या पक्षाच्या तिकिटावर लोकसभेवर मोठ्या मतांनी निवडून गेले. ते कै. शंकरराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे सभासद असून, त्यांच्याकडे कारखान्याचे १.२० लाखांचे आठ शेअर आहेत. बऱ्याच सहकारी संस्थांवर ते संचालक आहेत, तर शिवरत्न उद्योग समूहाचे ते सर्वेसर्वा आहेत.
४७ वर्षांचे धैर्यशील हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून २०२१ मध्ये एमबीए झाले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता सुमारे ५० कोटींच्या घरात आहे. त्यांच्यावर विविध स्वरूपाचे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यातील बहुतांश राजकीय स्वरूपाचे आहेत. त्यांच्या रूपाने सहकार क्षेत्राचा आवाज लोकसभेत पोहोचला आहे, तो किती निनादतो हे आगामी काळात कळेलच.
संजय मंडलिक
लोकसभा निवडणुकीत साखर कारखानदारी आणखी एका लढतीने चर्चेत राहिली, ती म्हणजे कोल्हापूर मतदारसंघ. कै. सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक यांना छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून मोठ्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. शाहू महाराजांना सुमारे साडेसात लाख मते पडली, तर मंडलिक यांना सुमारे सहा लाख मते मिळाली.
संजय मंडलिक हे एमए बीएड आहेत. त्यांची एकूण मालमत्ता १५ कोटींच्या घरात आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे.
संजय मंडलिक हे सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते कै. सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव. सदाशिवराव मंडलिक सलग चार वेळा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. भीमा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी २०१४ मध्ये मंडलिकांवर विजय मिळवला. २०१९ मध्ये संजय मंडलिक खासदार झाले. मात्र २०२४ ला त्यांचा पराभव झाला.
खरं तर शाहू महाराजांच्या विजयाचे श्रेय दोन नेत्यांना जाते. त्यांच्यासाठी साखर उद्योग क्षेत्रातील दोन दिग्गज लढले. ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील आणि माजी मंत्री सतेज पाटील हे ते नेते आहेत. कोल्हापुरातील प्रचार संपताच पी. एन. पाटील यांचे दुर्दैवी निधन झाले.
ओमराजे निंबाळकर
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झालेले ओमराजे निंबाळकर हे एकेकाळी तेरणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचा पराभव करून, लोकांनी मोठ्या विश्वासाने निंबाळकर यांना कारखाना चालवायला दिला होता. परंतु ते त्यांना जमले नाही. त्यामागे बरीच कारणे होती.
तरुण ओमराजे दुसऱ्यांदा सलग लोकसभेवर निवडून गेले आहेत.
विशाल पाटील
महाराष्ट्राच्या सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून अपक्ष म्हणून मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. ते वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. सध्या कारखाना श्रीदत्त इंडिया प्रा. लि. ला चालवण्यासाठी दिला आहे. मात्र कारखान्यापुढे अनेक अडचणी आहेत.
सांगलीतील जनता दिवंगत वसंतदादा यांना विशाल यांच्या रूपात पाहतात. वसंतदादांच्या पुण्याईमुळेच ते खासदार झाले. त्यांचे मोठे बंधू प्रतीक आणि वडील प्रकाशबापू यांनीही लोकसभेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रतीक केंद्रात राज्यमंत्रीही होते, मात्र ते आता राजकारणापासून दूर राहतात. विशाल यांना मात्र राजकारणात रस आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे युवा नेतृत्व अशी त्यांनी ओळख बनत चालली आहे. सहकार आणि साखर क्षेत्राच्या त्यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.