कोणत्या साखरसम्राटांना लागला आमदारकीचा गुलाल?
भागा वरखडे
……………
साखर कारखाना ताब्यात असला, की त्यातून राजकारण करता येते. विधानसभेचं दार खुलं होतं; परंतु सर्वंच साखर सम्राटांना हे दार खुलं होत नाही. काहींना कारखान्याचा कारभार घरी बसवतो, तर काहींनी कितीही काम केलं, तरीही त्यांना मतदार विधानसभेत पोचू देत नाही. साखर कारखानदारीत शरद पवार यांचा वरचष्मा होता. या विधानसभेच्या निवडणुकीनं हा वरचष्मा संपवला असून आता अजितदादा आणि भाजपनं साखर कारखानदारांना जास्त प्रमाणात निवडून आणलं आहे.
……………..
एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ हे सहकाराचं ब्रीद असलं, तरी विधानसभेच्या निवडणुकीत मात्र साखर कारखानदार नेमकं त्याच्या उलटं करतात. त्याची आडवू, त्याची जिरवू, ही मोहीम राबवतात. महाराष्ट्रात बंडखोरी करण्यात साखर कारखानदारच आघाडीवर होते.
त्याचं कारण संस्थात्मक जाळं आणि पैसा हाताशी असतो. असं असूनही अनेक साखर कारखानदारांना घरी बसावं लागलं. त्यात साखर कारखाना आणि शैक्षणिक संस्थांवरच्या छाप्यामुळं विवेक कोल्हे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत न उतरण्याचा जो निर्णय घेतला, तो विरोधकांची झालेली वाताहात पाहता शहाणपणाचा ठरला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बहुतांश साखर कारखानदारांनी या निवडणुकीत नशीब अजमावलं.
त्यामध्ये काहींना आमदारकीचा गुलाल लागला तर काहींना मतदारांनी नाकारलं.. मातब्बर नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. विशेषतः पुणे जिल्ह्यात तर बहुतांश साखर कारखानदारांना मतदारांनी नाकारलं. त्यात संग्राम थोपटे, युगेंद्र पवार, हर्षवर्धन पाटील, अशोक पवार आदींचा समावेश होतो. त्याचवेळी भरपूर आरोप असतानाही राहुल कुल यांनी मात्र बाजी मारली. दिलीप वळसे पाटील थोडक्यात बचावले. सत्यशील शेरकर आणि देवदत्त निकम यांनी प्रस्थापितांना जोरदार टक्कर दिली; मात्र त्यांना विजयश्रीने हुलकावणी दिली.
अजितदादांच्या विजयाबाबत कुणाच्याच मनात शंका नव्हती. राज्यात साखर कारखानदारी ११ लाख कोटी रुपयांची उलाढाल करते. ४० लाख सभासद असलेल्या कारखान्यांशी या ना त्या कारणानं दोन कोटी मतदार जोडले आहेत. साखर कारखानदारीचा मतदारांवर किती प्रभाव असतो, हे त्यावरून दिसते. कोल्हापूरपासून मराठवाड्यापर्यंत साखर कारखानदारीचा प्रभाव असतो.
यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत साखर उद्योगाशी संबंधित सुमारे ७९ उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते. साखर उद्योगाशी संबधित प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते बाळासाहेब पाटील, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मांजरा साखर परिवाराचे धीरज देशमुख, कोल्हापूरच्या बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सा. रे. पाटलांचे वारसदार गणपतराव पाटील, कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, अशोक पवार, संग्राम थोपटे, हर्षवर्धन पाटील आदी साखर उद्योगातील दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘भीमाशंकर’चे सर्वेसर्वा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, ‘विठ्ठलचे अभिजीत पाटील, राजाराम कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक, भीमा-पाटस कारखान्याचे राहुल कुल, ‘जवाहर’चे राहुल आवाडे, वारणा समूहाचे नेते विनय कोरे, बारामती ॲग्रोचे रोहित पवार आदींनी विजय खेचून आणली आहे. मात्र आ. रोहित पवार काठावर पास झाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अधिपत्याखाली खासगी आणि सहकारी असे दोन्ही प्रकारचे साखर कारखाने आहेत. अजित पवार यांना एक लाख ८१ हजार १३२ मते मिळाली, तर युगेंद्र पवार यांना ८०, २३३ मते मिळाली. अजित पवार यांचा एक लाखावर मताधिक्क्यानी विजय झाला. विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील हे अटीतटीच्या लढतीत आंबेगाव मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा सुमारे दीड हजार मतांनी पराभव केला.
बाबा विरुद्ध बाबा
माजी सहकारमंत्री आणि शरद पवार यांच्या पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांचा कराड उत्तर मतदारसंघातून भाजपच्या मनोज घोरपडे यांनी तब्बल ४३ हजार ६९१ मतांनी पराभव करत, एकतर्फी लढत जिंकली. कराड दक्षिण मतदारसंघातून कृष्णा साखर कारखान्याचे सर्वेसर्वा सुरेश भोसले यांचे पुत्र, भाजप नेते डॉ. अतुल भोसले ऊर्फ बाबा यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, म्हणजेच सिनिअर बाबा यांचा ३९ हजार ३५५ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान औताडे यांच्यात अटीतटीची लढत झाली आणि त्यात औताडे यांनी भालके यांचा ८ हजार ४३० मतांनी पराभव केला.
या ठिकाणी शरद पवारांच्या पक्षाचे अनिल सावंत उभे होते, त्यांना १० हजार २१७ मते मिळाली. इंदापूरमध्ये माजी मंत्री, राष्ट्रीय सहरकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा पराभवाचा धक्का बसला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा धोका त्यांनी पत्करला होता; मात्र त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि अजित पवार यांच्या पक्षाचे दत्तामामा भरणे यांनी १९ हजार ४१० मतांनी पराभव केला.
रोहित पवारांचा निसटता विजय, साताऱ्यात सहा साखरसम्राट विजयी
सोनई समूहाचे प्रवीण माने यांनी तब्बल ४० हजार मते घेतल्याने पाटील यांचा प्रभाव झाला. कर्जत जामखेडमधून बारामती ॲग्रोचे संचालक रोहित पवार यांना निसटता विजय मिळाला. त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांच्यावर अवघी १२४३ मतांची आघाडी घेतली. याच ठिकाणी आणखी एक रोहित पवार (अपक्ष) उभे होते. त्यांना ३४८९ मते मिळाली आहेत. राज्याच्या राजकारणावर नेहमीच साखर सम्राटांचे वर्चस्व राहिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक मतदारसंघांत साखर उद्योगाशी निगडित असलेले उमेदवार विजयी झाले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी सहा मतदारसंघांत साखरसम्राट जिंकले आहेत. या सहा आमदारांपैकी कोणी कारखान्याचे अध्यक्ष, तर कोणी संचालक आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर साखर कारखानदारांचाच वरचष्मा असल्याचे चित्र आहे.
सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, किसन वीर यांच्या सहकारातील योगदानामुळे पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी चांगलीच रुजली. या कारखानदारीच्या निमित्ताने अनेकांना रोजगार देत आहेत. शेतकऱ्यांना उसासारखे पीक घेऊन चार पैसे हातात पडू लागले. साहजिकच हाच शेतकरी त्या कारखान्याचा आणि पर्यायाने कारखान्याच्या संचालकांशी जोडला गेला.
निवडणुकीत हेच कारखानदार उभे राहिल्याने शेतकरी मतदार झाला आणि कारखानदार नेते झाले. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी हे सहकारातील उद्योग चांगले रुजले आहेत. या उद्योगांच्या निमित्ताने गावातील अनेक तरुणांना रोजगार देता आला. त्यांचे संसार उभे राहिले. त्यांच्या मदतीने अनेक कारखानदारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सहज जिंकल्या आहेत. कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणावर वचक निर्माण करण्यासाठी भाजपने या क्षेत्राचा पुरेपूर उपयोग केला. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर वरचष्मा असणाऱ्या नेत्यांनाच सर्वपक्षीयांनी उमेदवारीमध्ये वरचे स्थान दिले आहे. यंदाच्या निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळाले. प्रचार मुद्द्यांपेक्षा जात आणि आरक्षण आणि अभूतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत साखरसम्राटांनी मैदान मारले.
कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपचे आमदार हे रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आहेत, तर कऱ्हाड उत्तरमधील भाजपचे आमदार मनोज घोरपडे हे पडळ (ता. खटाव) येथील माण-खटाव ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे सहअध्यक्ष आहेत. पाटणमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले शंभूराज देसाई हे मरळी (ता. पाटण) बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आहेत.
तिसरे बाबा विक्रमी मतांनी विजयी
सातारा मतदारसंघातून १ लाख ४२ हजार १२४ या विक्रमी मतांनी निवडून आलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले ऊर्फ शिवेंद्र बाबा हे शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आहेत, तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखानाही त्यांच्या ताब्यात आहे.
वाई मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले मकरंद पाटील हे भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. खंडाळा साखर कारखान्यावरही त्यांचे वर्चस्व आहे. कोरेगाव मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले महेश शिंदेही साखर उद्योगाशी निगडित असून, त्यांच्या साखर उद्योगाशी निगडीत कंपन्या आहेत.
कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून पाच वेळा प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब पाटील यांच्याकडे अनेक दशकांपासून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता आहे. त्यांचा भाजपच्या मनोज घोरपडेंकडून पराभव झाला, तर घोरपडे यांचे व्यावसायिक भागीदार आणि पडळ येथील कारखान्याचे अध्यक्ष असलेले प्रभाकर घार्गे हे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माणमधून निवडणूक लढवली होती; परंतु त्यांचा जयकुमार गोरे यांच्याकडून पराभव झाला.
पाच हजार गाळप क्षमतेचा मतदारसंघातील एक कारखाना म्हणजे १५ ते २० हजार कुटुंबातील संपर्काचे केंद्र असते. प्रत्येकाच्या घरातील तीन किंवा चार मतदार म्हणजे ६० ते ६५ हजार सभासदांचा मतदारसंघ बांधलेला असतो. या प्रत्येकाच्या घरातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमाची निमंत्रणे शेतकरी त्यांच्या नेत्यांकडे आवर्जून पाठवतात.
केंद्रामध्ये भाजप सरकारकडून स्वतंत्र ‘सहकार’ खाते करणे या मतदारसंघावरची पकड निर्माण करण्याचा एक भाग आहे. नगर जिल्ह्याचा विचार करता आशुतोष काळे, राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, रोहित पवार, अमित भांगरे हे साखर कारखानदारीशी संबंधित नेते निवडून आले.
शंकरराव गडाख आणि चंद्रशेखर घुले हे व्याही, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, अनुराधा नागवडे, राहुल जगताप हे पराभूत झाले. विक्रमसिंह पाचपुते यांचे कारखाने असले, तरी ते भाडेपट्ट्याने दिले आहेत. त्यांचा श्रीगोंद्यात विजय झाला.
विधानसभेची दारे कुणासाठी बंद…
जयंत पाटील, हसन मुश्रीफ, राहुल आवाडे, अभिजीत पाटील, अमल महाडिक, डॉ. विनय कोरे, सुरेश धस, संभाजी निलंगेकर, अभिमन्यू पवार, राणा जगजितसिंग पाटील, सुभाष देशमुख, सत्यजीत देशमुख, विश्वजीत कदम, अमित देशमुख आदींनी विधानसभेत प्रवेश केला, तर राजेश टोपे, बाळसाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, गणपतराव पाटील, युगेंद्र पवार (शरयू ॲग्रो), संग्राम थोपटे, ए.वाय. पाटील, समरजित घाटगे, प्रभाकर घार्गे, जयप्रकाश दांडेगावकर, मानसिंग खोराटे यांना विधानसभेचं दार बंद राहिलं.
(लेखक भागा वरखडे हे वरिष्ठ पत्रकार असून, सहकार आणि साखर उद्योगाचे अभ्यासक आहेत. सविस्तर लेखासाठी ‘शुगरटुडे’चा डिसेंबर २०२४ अंक जरूर वाचा. त्यासाठी, तसेच संग्राह्य दिवाळी अंकासाठी ८९९९७७६७२१ वर व्हॉट्सॲप संदेश पाठवा)
दिवाळी अंकाची किंमत टपाल खर्चासह रू. ३०० आहे. सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट ८९९९७७६७२१ वर व्हॉट्सॲप करा.
काय आहे दिवाळी अंकात….