देशात ४० लाख टन साखर इथेनॉलकडे वळवणार?

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : जागतिक पातळीवरील अनेक संस्थांनी आगामी गळीत हंगामात (२०२५-२६) जगात साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज  व्यक्त केला आहे. सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टांमुळे साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळत आहे.  भारत व ब्राझील, इथेनॉल उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. त्याचपार्श्वभूमीवर २०२५ मध्ये भारतात अंदाजे ३५ लाख टन साखर इथेनॉलसाठी वळवण्यात आली होती. २०२६ मध्ये हे प्रमाण ४० लाख टनांवर जाण्याची शक्यता व्यक्त वर्तविण्यात येत आहे.

‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने  (इस्मा) २०२४-२५ च्या हंगामातील पाच वर्षांतील नीचांकी २९०.५ लाख टनांच्या तुलनेत २०२५-२६ मध्ये उत्पादनात लक्षणीय वाढीचा अंदाज व्यक्त केला. थायलंडचे २०२५-२६ मधील साखर उत्पादन २ टक्क्यांनी वाढून १०० लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर चीनमध्ये उत्पादन ५ लाख टनांनी वाढून ११० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागानेही (यूएसडीए) साखर उत्पादन वाढण्याच्या संकेताला दुजोरा दिला आहे. प्रमुख साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझील व भारतामध्येच साखर उत्पादन वाढण्याची शक्यता असून जगात २०२५-२६ मध्ये १८९० लाख टन साखर तयार होऊ शकते. यामध्ये ब्राझीलचे उत्पादन सर्वाधिक म्हणजे ४४० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे.

‘डाटाम्रो’ या संस्थेने, ब्राझीलमध्ये दक्षिण मध्य भागात साखर उत्पादन ६ टक्क्यांनी वाढून ४२० लाख टनांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला.  ‘सिझरनिको’ने हा अंदाज  ४३० लाख टनांचा दिला आहे.  ‘क्रिसिल’च्या अहवालानुसार, २०२५-२६ मध्ये भारताचे एकूण साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून सुमारे ३५० टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

४१० लाख टन अतिरिक्त साखर तयार होण्याचा अंदाज

साखरेच्या वाढीव उत्पादनामुळे ४१० लाख टन अतिरिक्त साखर तयार होईल. जादा उत्पादनाचा अंदाज पाहिल्यास साखरेला जगातील सर्वच बाजारपेठांमध्ये दरासाठी संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. जादा पुरवठा व अतिरिक्त साठ्याच्या अंदाजामुळे जागातिक बाजारात आतापासून दरात चढ-उतार होत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »