राजुरीतील इथेनॉल प्रकल्पाबाबत योग्य तो मार्ग काढणार : पवार

प्रकल्प रद्द करण्याबाबत शेतकरी संघर्ष समितीचे शरद पवार यांना साकडे
पुणे : शेतकरी हा कृषी जीवनाचा आत्मा आहे. जर राजुरी येथील इथेनॉल प्रकल्पामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत असतील, तर राज्य सरकारने यावर सखोल विचार करणे आवश्यक आहे. पुणे-नाशिक महामार्ग आणि राजुरीतील इथेनॉल प्रकल्पाच्या बाबतीत मी स्वतः लक्ष घालून योग्य तो मार्ग काढणार असल्याचे आश्वासन माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले. राजुरी येथील इथेनॉल प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळामध्ये जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे बाळासाहेब औटी, हनुमान देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर औटी यांसह अनेक शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने दोन प्रमुख मागण्या मांडल्या. पहिली मागणी म्हणजे, सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० मुळे नवीन द्रुतगती महामार्गाची गरज नाही. या नवीन महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन आणि बेरोजगार बनून विस्थापित होतील. तसेच, यामुळे वनक्षेत्रातील पर्यावरणाला आणि जैवविविधतेला धोका निर्माण होईल. दुसरी मागणी जुन्नर शुगर लिमिटेड, राजुरीच्या प्रस्तावित इथेनॉल या प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती शेतकऱ्यांनी दिली.