ऊसदराची स्पर्धा कायम ठेण्यास भाग पाडणार

चंद्रराव तावरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान
बारामती : माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना वाऱ्यावर सोडणार नाही. खासगी कारखान्यांच्या तुलनेत ‘माळेगाव’च्या विस्तारीकरणासाठी अध्यक्षांना पत्र देणार आहे. पाच लाख लिटरचा इथेनॉल प्रकल्पासाठी आग्रह धरणार असून, ऊसदराची स्पर्धा कायम ठेण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडणार असल्याचे कारखान्याचे संचालक आणि विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी सांगितले. माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यात निळकंठेश्वर पॅनेल विजयी झाला. तर, चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल पराभूत झाला. या पार्श्वभूमीवर सहकार बचाव पॅनेलची सांगवी येथे आभार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, स्पर्धा कायम रहावी, यासाठी सहकार क्षेत्रातील माळेगाव साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात असावा, अशी मनोमन इच्छा बहुतांशी शेतकऱ्यांची होती. परंतु पैसे घेऊन लाचार झालेल्या काही सभासदांनी चुकीचा निर्णय घेतला आणि आमचा पराभव झाला. परंतु, सात हजारांपेक्षा अधिक प्रमाणिक सभासदांनी या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला. त्याच्या जोरावर यापुढेही सभासदांच्या भल्यासाठी लढत राहणार आहे.
ही निवडणूक सत्तेचा गैरवापर करून जिंकली असा आरोप करत तावरे म्हणाले की, माळेगावचा विजय अजित पवारांना मिळावा, यासाठी तिसरे पॅनेल तयार केले. वास्तविक हे सर्व पवार एकच आहेत, हे माळेगावच्या निवडणुकीत स्पष्ट झाले. खासगी कारखान्यांना अधिकचा ऊस दरासाठी माळेगाव कारखाना अडथळा ठरत होता. तो अडथळा दूर करण्यासाठी घरचा कारखाना सोडून अजित पवार माळेगाव घेण्यासाठी आले. परंतु त्यांचा मनसुबा आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. चिन्ह वाटप, मतदान प्रक्रिया ते मतमोजणी निकालापर्यंत त्यांनी प्रचंड पैशाचा आणि सत्तेचा दुरुपयोग केला. एक दिवस हाच पैसाच त्यांचा घात केल्याशिवाय राहणार नसल्याचे ठणकावून सांगितले.