‘सोमेश्वर’ प्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करणार : बोत्रे पाटील
अहिल्यानगर/पुणे : ‘ओंकार’ समूहातील गौरी शुगरच्या हिरडगाव युनिटने गेल्या गाळप हंगामात ऊसाला प्रति टन ३ हजार रुपये भाव दिला. यंदा या युनिटने १० लाख मे.टन, तर देवदैठण युनिटने ३ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे दोन्ही कारखाने अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक भाव देतील, तसेच भविष्यात सोमेश्वर कारखान्याप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून, अशी ग्वाही गौरी शुगरचे अध्यक्ष बाबूराव बोत्रेपाटील यांनी दिली.
गेल्या वर्षी गौरी शुगरला ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला त्यांना दिवाळीसाठी मोफत साखर देण्याचा प्रारंभ बोत्रेपाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बोत्रे यांनी मोफत साखर देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल हिरडगाव येथील शेतकऱ्यांनी हिरडगाव फाटा येथे सत्कार केला.
बोत्रे म्हणाले, ओंकार उद्योग समुहाची नऊ शुगर प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दाम आणि दिवाळीला मोफत साखर हे धोरण घेतले आहे. त्यामुळे साखर क्षेत्रात महाराष्ट्रात ‘ओंकार’ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हिरडगावचा प्रकल्प सुरू करताना आमदार बबनराव पाचपुते यांनी मोठे स्वप्न ठेवले होते. परंतु राजकारणामुळे त्यांना अडचण आली. आता ३०० केपीएलडी डिस्टलरी सुरु करणार आहोत. ४० मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू आहे. भविष्यात सोमेश्वर साखर कारखान्यामाणे ऊसाला कसा भाव देता येईल, यासाठी प्रयत्न केला जाईल. शेवटी साखर कारखाने शेतकऱ्यांचे आहेत. त्यातून त्यांच्या जीवनात आनंदाचा गोडवा निर्माण केला, तर आपोआप व्यवसाय यशस्वी होतो, यावर आपला विश्वास आहे असे बोत्रे यांनी सांगितले.
प्रास्ताविक मॅनेजिंग डायरेक्टर रोहिदास यादव यांनी केले. यावेळी मिलिंद दरेकर, संपत दरेकर, मारुती औटी, नवनाथ देवकर, अजय शेळके, बाळासाहेब वाळके, सुरेश शेंडगे, विश्वास भुजबळ उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातही साखर वाटप
मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथेदेखील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. युनिट ४ तर्फे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांना मोफत साखर वाटपाचा शुभारंभ ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोविंदराजे निंबाळकर, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह मोकाशी, भाऊसाहेब जाधव, बाळासाहेव फराटे, चौरंगनाथ जगताप, लक्ष्मणबापू फराटे, दत्तात्रय गदादे आदी उपस्थित होते.
बोत्रे पाटील म्हणाले की, गळीत हंगाम २०२३- २४ मध्ये ऊस गाळपास दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीसाठी मोफत साखर वाटप केले जात आहे. १ ते ३० मेट्रिक टन ऊस गळीत देणाऱ्यास १० किलो, ३१ ते ५० मेट्रिक टन देणाऱ्यास २० किलो, ५१ ते १०० मेट्रिक टननुसार ३० किलो, १०१ ते १५१ मेट्रिक टनास ४० किलो, १५१ ते २०० मेट्रिक टन ५० किलो, २०१ ते ३०० मेट्रिक टन ७० किलो व ३०० मेट्रिक टन व अधिक ऊस देणाऱ्यास १०० किलो, अशा पद्धतीने साखर दिली जात आहे.
आगामी गळीत हंगाम मांडवगण फराटा व कार्यक्षेत्रातील ऊसतोडीसंदर्भात जर शेतकऱ्यांना अडचणी आल्या, तर त्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आगामी हंगामातही शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस गाळपास द्यावा, असे आवाहन बोत्रे पाटील यांनी केले.