नॅचरल शुगरला WISMA चा सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना ऊस विकासात नंबर वन्‌

पुणे : महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रातील १३३ साखर कारखान्यांचे शिखर संघटन असलेल्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (WISMA) पुरस्कार शनिवारी जाहीर झाले. नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि. ला (जि. धाराशिव) सर्वोत्कृष्ट साखर कारखान्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर पुणे जिल्ह्यातील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने ऊस विकासात बाजी मारली आहे.

  WISMA चे अध्यक्ष बी. बी. ठोंबर यांनी साखर संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. संघटनेच्या वतीने आयोजित वार्षिक तांत्रिक परिषद, पारितोषिक वितरण आणि तंत्रज्ञान प्रदर्शन २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत, सिद्धीसाज गार्डन, डीपी रोड, पुणे येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला साखर उद्योगाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरणे दिली जातील. यामध्ये खालील प्रमुख विषयांचा समावेश असेल:

  • भारतीय साखर उद्योगातील परिवर्तन आणि भविष्याचा मार्ग.
  • साखर आणि संबंधित उत्पादनांच्या निर्मिती व प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर.
  • हरित हायड्रोजन उत्पादन: साखर उद्योगासाठी समृद्धीचे क्षितिज.

WISMA सलग दुसऱ्या वर्षी निवडक सभासद कारखान्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पारितोषिके देऊन सन्मानित करणार आहे. २०२४-२५ करिता खालीलप्रमाणे पारितोषिके जाहीर केली जात आहेत :

  • सर्वोत्कृष्ट ऊस विकास: श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि., पुणे .
  • सर्वोत्कृष्ट तांत्रिक व नावीन्यपूर्ण कार्य: जयवंत शुगर्स लि., सातारा.
  • सर्वोत्कृष्ट जैवऊर्जा व जैवइंधनामध्ये कार्य: श्री गुरुदत्त शुगर्स लि., कोल्हापूर.
  • सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन: द्वारकाधीश साखर कारखाना लि., नाशिक.
  • सर्वोत्कृष्ट सामाजिक दायित्व: दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लि., कोल्हापूर.
  • सर्वोत्कृष्ट साखर कारखाना: नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि., धाराशिव.

सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचे पुरस्कार पटकावणारा नॅचरल शुगर हा कारखाना WISMA अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दशकांपासून यशस्वीपणे सुरू आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »