श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना *सर्वोत्कृष्ट ऊस विकास* पुरस्काराने सन्मानित

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन, पुणे (विस्मा) या संस्थेचा   “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्काराने” श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि, श्रीनाथनगर, पाटेठाण, या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील, विस्माचे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक, पांडुरंग राऊत, कार्याध्यक्ष विकास (अण्णा) रासकर, सह-कार्यकारी संचालक,  माधव राऊत, संचालक, महेश करपे, हेमंत करंजे,  अनिल बधे,  ज्ञानदेव कदम, भगवान मेमाणे,  मुकुंद दरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी,  डी. एम. रासकर, जनरल मॅनेजर (बाय प्रॉडक्ट), आर.एस. शेवाळे, केन मॅनेजर, एस. बी. टिळेकर, शेतकी अधिकारी, ए. बी. शेंडगे, ऊस विकास अधिकारी  डी. एस. रोडे, अॅग्री ओव्हरशिअर,  बी.एन.होलगुंडे, व्ही.पी.होले इ. उपस्थित होते.

          वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन (विस्मा) राज्यातील १३३ खाजगी साखर कारखान्यांची शिखर संघटना आहे. या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील खाजगी साखर उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निवडक कारखान्यांना सन्मानित करण्यात आले आहे. साखर उद्योगामध्ये जास्तीत जास्त आधुनिकतेचा वापर करून साखर उद्योग वाढण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. यामधील देश पातळीवर कार्यरत असणारी “वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन ही एक कार्यरत संस्था आहे.

         

बांधावर जाऊन मार्गदर्शन – राऊत

सदरचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार” स्वीकारताना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, पांडुरंग राऊत म्हणाले की, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची या पुरस्कार करिता निर्धारीत निकषांनुसार निवड केली त्याबद्दल विस्मा चे आभार. साखर कारखाना चालवत असताना नेहमी काळाची पावले ओळखून निर्णय घेणे आवश्यक असते ग्रामीण भागातील अर्थकारण बदलणारा खूप जुना साखर उद्योग आहे. त्यामुळे साखर उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एका अर्थाने कणा आहे. या उद्योगात काळानुरूप बदल करत जागतिक स्पर्धेत उतरणे गरजेचे असते. त्यामध्ये पडणारा दुष्काळ, अतिरिक्त पाऊस, त्यामुळे ऊस उत्पादनामध्ये नेहमी चढ-उतार येत असतात. या सर्व बाबी लक्षात घेवून कमी खर्चामध्ये जास्त ऊस उत्पादन घेता यावे यासाठी कारखान्याने प्रयत्न सुरू करून कारखान्यामध्ये स्वतंत्र ऊस विकास विभागाची स्थापना केलेली आहे. शेतकर्‍यांना प्रत्यक्ष बांधावर जावून मार्गदर्शन केले जाते. प्रती एकर ऊस उत्पादन खर्च कमी करून ऊस ऊत्पादकता वाढविणेसाठी “थोडेसे बदला एकरी १०० मे.टन उत्पादन मिळवा” ही योजना राबविली जाते.

या योजनेत शेतकरी सहभाग वाढवुन ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातात. एकरी १०० मे.टन पेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणारे गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये २३ शेतकरी तर २०२४-२५ मध्ये ५७ शेतकरी होते.

श्रीनाथ पायलट योजने अंतर्गत कमी ऊस उत्पादन घेणार्‍या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना लागण व खोडवा पिक संदर्भात मार्गर्शन करून ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जातात. कारखान्या मार्फत त्रिस्तरीय बेणे मळा योजना प्रभावीपणे राबविली जाते.

मध्यवर्ती उस संशोधन केंद्र पाडेगाव, व्ही. एस. आय, पुणे येथील सुधारीत ऊस जातींच्या बेण्याचा कारखान्यामार्फत पुरवठा केला जातो. कारखान्याने १ हेक्टर क्षेत्रावर स्वत:चा बेणे मळा विकसित केला आहे. सुपरकेन नर्सरी योजना, मोठ्या प्रमाणात राबवली जाते. तसेच कार्यक्षेत्रातील ०७ विभागात डेमो प्लॉटस् घेतले जातात.

     कारखान्याचा ऊस विकास विभाग, व्हीएसआय शास्त्रज्ञ, DSTA तंत्रज्ञ, पाडेगाव शास्त्रज्ञ तसेच महात्मा फुले कृषिविद्यापीठ यांच्यामार्फत शेतकरी मेळाव्यातुन मार्गदर्शन करण्यात येते. कारखान्याच्या कृषी सेवा केंद्रमार्फत वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट मांजरीची जैविक फवारणी आळवणीची खते, किड/बुरशीनाशके अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना दिले जाते. ऊस पिक यांत्रिकीकरणामध्ये शेतकऱ्यांना ऊस लागवड यंत्र, बूम प्रेअर मशिन, रटुन मॅनेजर इ. औजारे भाडेतत्वावर दिली जातात. दरवर्षी मातीचे नमुने गोळा करून तपासणीनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. औषध फवारणीसाठी ड्रोन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कारखान्याचे बायोकंपोस्ट शेतकऱ्यांना माफक दरात दिले जाते. ऊस पिकासाठी ए.आय. तंत्रज्ञानासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. ठिबक सिंचन योजनेखाली ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. विविध चर्चासत्रे, प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेतला जातो.

          कारखान्याच्या माध्यमातून देशाचा पोषण कर्ता असलेल्या शेतकरी बांधवांकरिता त्यांच्या आर्थिक स्थैर्या करिता भरीव कार्य केले जात आहे. शेतकरी बांधवांकरीता विविध मार्गदर्शन कार्यशाळा घेणे, मोफत आरोग्य शिबिरे घेणे, ऊस तोडणी मंजुरांच्या मुलांकरिता साखर शाळा, पाळणा घर चालवणे, पाणलोट क्षेत्राच्या विकासा करिता विविध गावातील तळे खोलीकरण करणे, नैसर्गिक समतोल राहावा यासाठी प्रामुख्याने प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करून झाडांचे जतन केले जाते.

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन या संस्थेचे आभार मानले व अशाच प्रकारे भविष्यकाळात ही संस्था देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपास येवो अशी सदीच्छा दिल्या.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »