विस्मा “बायोफ्युयल व बायोएनर्जी सेमिनार १९ ला
पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) च्या वतीने “बायोफ्युयल व बायोएनर्जी सेमिनारचे आयोजन १९ एप्रिल २०२३ रोजी पुण्यात कोरिथियन्स रिसॉर्ट येथे करण्यात आले आहे, अशी माहिती ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी दिली.
साखर उद्योगामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी साखरेबरोबरच राष्ट्रीय इंधन कार्यक्रमामध्ये मोठया प्रमाणावर इथेनॉलचा पुरवठा करुन आघाडी घेतली आहे. भारत सरकारच्या बायोफ्युएल धोरणानुसार बायोसीएनजी, ग्रीन हायड्रोजन ही नवी जैविक इंधने आघाडीवर असून ऊस पीक व साखर उद्योगाकरिता सोनेरी दिशा दाखवित आहेत.
यास्तव वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (एन.जी.ओ.) विस्मा, महाराष्ट्र साखर संघ (मुंबई), डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया, कर्नाटक शुगर मिल्स असोसिएशन बंगळुरू व कोजन इंडिया यांच्या सहयोगाने हा “बायोफ्युयल व बायोएनर्जी सेमिनार’’ आयोजित करण्यात आला आहे.
त्याला जोडूनच नामांकित कंपन्यांचे तंत्रज्ञान व माहिती प्रदर्शन १९ एप्रिल रोजीच कोरिथियन्स रिसॉर्ट, न्याती काउंटी, एनआयबीएम ऍनेक्स, पुणे- ४११ ०६० – येथे सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत आयोजित केले आहे.
भारतातील व आंतराष्ट्रीय नामांकित कंपन्या, राष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या संशोधन संस्थेमधील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ परिसंवादामध्ये मार्गदर्शन व सादरीकरण करणार आहेत.
यामध्ये भारत सरकारच्या नवीनतम व अपारंपरिक ऊर्जा विभागाचे अतिरिक्त सचिव श्री. सुबोधकुमार सिंग , सहसचिव श्री. दिनेश जगदाळे, तसेच महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे संबोधित करणार आहेत.
राष्ट्रीय प्राध्यापिका रितू बॅनर्जी (आयआयटी, खरगपूर), डॉ. अतुल चासकर (आयसीटी, मुंबई), डॉ. विक्रम पत्तरकीरने (विरिडियम ए आय, युएसए) इ. नामावंत तज्ज्ञ त्यांच्या संशोधनाबद्दल साखर उद्योगास मार्गदर्शन करणार आहेत.
हा परिसंवाद साखर क्षेत्रातील संबंधित घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्ञानवृद्धीसाठी आवर्जून परिसंवादाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, कार्यकारी संचालक चौगुले आणि महासचिव पी. ए. राऊत यांनी केले आहे.