वजन-काट्यास संगणक जोडण्यास मनाई : ‘विस्मा’ने वेधले अडचणींकडे लक्ष

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : वजन-काट्यास संगणक आणि प्रिंटर जोडण्यास मनाई करणारा आदेश त्वरित मागे घ्यावा व कारखाना आणि शेतकऱ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी आग्रही मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केली आहे.

वैधमापन विभागाच्या नियंत्रकांना ठोंबरे यांनी यासंदर्भात सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, ‘या संदर्भीय आदेशान्वये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच सहकारी व खसगी साखर कारखान्यांनी ऊस वजन काटयाचे डिजीटायजेशन करून घेतलेले आहे. मात्र आपले वरील संदर्भीय परिपत्रक आदेशातील तरतुदीनुसार सदर डिजीटाईज्ड वजन काटयास संगणक व प्रिंटर जोडण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बाब कारखान्यांच्या दैनंदिन कामकाजाचे दृष्टीने अत्यंत अडचणीची व गैरसोईची आहे.. ’

‘आपणास विदित आहे की, महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांमध्ये संगणकाचा वापर १०० टक्के झालेला असून साखर कारखान्यातील सर्व कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने पेपरलेस झालेले आहे. पूर्वी पासूनच सर्व वजन काटे ईलेक्ट्रॉनिक पद्धतीचे असून त्यातील सर्व डाटा थेट संगणकाद्वारे केन बिलींगसह शेतक-यांचे पेमेंट बँकेत वर्ग करण्यासह ऑनलाईन पद्धतीने संगणकाद्वारे केले जात होते. वजन काट्यावर केलेले वजन सॉफ्टवेअर पद्धतीद्वारे ऑटोमॅटिकली ऊस पुरवठादाराचे नांव, गट नं, ऊसाची जात, लागण तारीख, तोडणी व वाहतुक ठेकेदाराचे नांव, वाहन क्रमांक इत्यादी सर्व माहिती निव्वळ वजनासह संगणकाद्वारे अकौंट विभागाकडे ऑनलाईन हस्तांतरित केली जात होती. त्यामुळे संपूर्ण माहिती अचूकपणे व ऑटोमॅटिकली सर्व संबंधित विभागाकडे पाठवून प्रोसेस केली जात होती’, असे पत्रात म्हटले आहे.

मात्र आपले वरील संदर्भीय आदेशानुसार आपण वजन काटयास संगणक न जोडण्याच्या सूचना दिल्या असल्याने वरील ऊस पूरवठादार तोड वाहतुक ठेकेदार या बाबतची सर्व माहिती व ऊसाचे वजन हे मॅन्युअली संगणकाला भरावे लागेल व त्यामुळे मानवी चुका मोठया प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तसेच वजन काट्यातील हा संपूर्ण डाटा मॅन्युअली कॉम्प्युटरला फीड करणे अत्यंत जिकरीचे व वेळखाऊ काम आहे. त्यामुळे हा डाटा केन बिलींगसाठी चुकीचा व विलंबाने गेल्यास शेतक-यांना व ऊस तोड वाहतुक ठेकेदारांना योग्य वेळी ऊसाचे पेमेंट अदा करणे ही अडचणीचे होणार आहे, असे पत्रात लक्ष वेधले आहे.

वरील प्रॅक्टीकल व वास्तव अडवणी व गैरसोय विचारात घेवून आपणास विनंती करण्यात येते की, आपण डिजीटायजेशन केलेल्या सर्व वजन काटयांना संगणक जोडून सदरचा डाटा केन बिलींग व इतर विभागास संगणकाद्वारे ऑनलाईन पाठवणेचे दृष्टीने मान्यता द्यावी, अशी विनंती ठोंबरे यांनी सर्व साखर कारखान्यांच्या वतीने केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »