‘विस्मा’चा पहिलाच पुरस्कार सोहळा उत्साहात, गरिबांचे अन्न श्रीमंतांचे इंधन होऊ नये : सूर्यवंशी
पुणे : ‘विस्मा’तर्फे प्रथमच साखर हंगाम २०२३-२४ मध्ये सभासद कारखान्यांना विविध पाच वर्गवारींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात विस्मा, पुणे ही साखर उदयोग क्षेत्रातील महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील खासगी साखर कारखान्यांची संघटना आहे.
आजवर अन्नदाता अशी शेतकऱ्याची ओळख होती, मात्र त्याच्या ओळखीला आता आणखी नवीन आयाम प्राप्त झाला आहे. साखर उद्योग क्षेत्रात नव्याने उपलब्ध झालेल्या संधींमुळे केवळ अन्नदाता ही ओळख न राहता, शेतकरी आता ऊर्जादाताच्या भूमिकेत शिरला असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर विस्माचे अध्यक्ष बी.बी .ठोंबरे, सचिव डॉ. पांडूरंग राऊत, भारत सरकारच्या नवीन व अपारंपरिक उर्जा विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संगीता कस्तुरे, यशदाचे सहाय्यक महासंचालक आणि माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, साखर संचालक राजेश सुरवसे, खासदार आणि येडेश्वरी साखर कारखान्याचे अध्यक्ष बजरंग सोनवणे, सहकार आयुक्त दीपक तावरे, प्राज इंडस्ट्रीच्या तांत्रिक आणि अभियांत्रीकी विभागाचे संचालक घनःश्याम देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्दारकाधीश साखर कारखाना लि., जिल्हा नाशिक (उत्कृष्ट ऊस शेती विकास), दालमिया भारत शुगर अॅण्ड इंडस्ट्रिज लि., जिल्हा कोल्हापूर (उत्कृष्ट साखर उत्पादन), श्री गुरूदत्त शुगर्स लि., जिल्हा कोल्हापूर (उत्कृष्ट उपपदार्थ उत्पादन), नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिज लि., जिल्हा धाराशिव (संशोधन विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रम) आणि व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लि., जिल्हा पुणे (उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन) या कारखान्यांना सन्मानित करण्यात आले.
गरिबांचे अन्न श्रीमंतांचे इंधन होऊ नये : सूर्यवंशी
विजय सूर्यवंशी म्हणाले की, जागतिक पातळीवर एनर्जी आणि अन्नाची उपलब्धता या दोन प्रमुख समस्या होत्या. परंतू संशोधनाच्या आधारावर निघालेल्या विविध पर्यायांमुळे या दोन्ही समस्यांचे निराकरण होऊ शकते. अन्नापासून इंधन तयार करताना गरिबांचे अन्न हे श्रीमंताचे इंधन होऊ नये, या पातळीवर देखील आपणास समतोल साधावा लागणार आहे. साखर उद्योग हा कल्पवृक्षासारखा असून दिवसागणिक त्याचे भवितव्य उज्जवल होत आहे.जगाची एनर्जीची गरज भागवण्याची क्षमता एकट्या साखर कारखान्यात आहे.
शेखर गायकवाड म्हणाले की, साखर उद्योगाकडून वाढत्या अपेक्षा आणि त्यांना उपलब्ध असलेले संधीचे अवकाश अफाट असून त्या संधी मिळवण्यासाठी भविष्याचा वेध घेत तंत्रज्ञानात बदल घडवून आणावे लागतील. वर्ष २०७० पर्यंत शंभर टक्के कार्बनमुक्ततेचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे.
डॉ. संगीता कस्तुरे यांनी साखर उद्योगांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या असलेल्या विविध कर्ज व अनुदान योजनांबद्दल माहिती दिली. अजित चौगुले यांनी मान्यवरांचे स्वागत केले, बी.बी. ठोंबरे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले, तर महेश देशमुख यांनी आभार मानले.