महाराष्ट्रात १०२ लाख टन साखर उत्पादनाचा ‘विस्मा’चा अंदाज

पुणे : महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात १०२ लाख टनापर्यंत साखरेचे उत्पादन होण्याच्या अंदाज ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन) व्यक्त केला आहे.
‘विस्मा’ची बैठक नुकतीच बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असता साखर उत्पादनाचे सुधारित अंदाज घोषित करण्यात आले.
राज्यातील ९४ सहकारी व ९२ खासगी साखर कारखान्यांनी मिळून, १५ नोव्हेंबरपर्यंत २३३ लाख टन ऊस गाळप करीत १९ लाख टनांपेक्षा अधिक साखर उत्पादन केले आहे. ‘विस्मा’च्या म्हणण्यानुसार राज्यातील सरासरी साखर उताऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उत्पादन १०० ते १०२ लाख टनाच्या आसपास राहू शकते. यातील १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याचे निव्वळ साखर उत्पादन सुमारे ९० लाख टन असेल.
साखर दर ४१०० रुपये करा
राज्यातील बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिक्विंटल ३३०० ते ३४०० इतके कमी आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढला असून कारखाने तोट्यात असल्यामुळे केंद्र शासनाने साखरेची किमान विक्री किंमत प्रतिक्विंटल ४१०० रुपये करावी अशी मागणीही ‘विस्मा’ने केली आहे.
चालू गाळप वर्ष २०२४-२४ मध्ये उसाच्या रास्त व किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ करण्यात आली आहे. इथेनॉलच्या उत्पादनात देखील वाढ झालेली आहे. यामुळे केंद्र शासनाने इथेनॉलचे दर प्रति लिटर पाच रुपयांपर्यंत वाढवण्याची आग्रही मागणी ‘विस्मा’च्या बैठकीत करण्यात आली.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदी करताना, खासगी साखर कारखान्यांना प्राधान्यक्रमात डावलण्यात आले आहे, अशी तक्रार करत ‘विस्मा’ने नाराजी व्यक्त केली आहे. इथेनॉल व साखर उत्पादनातील सध्याच्या जाचक अटी हटविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला, असे ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी सांगितले.