अन्यथा गळीत हंगाम बंद : विस्माचा सरकारला गंभीर इशारा
पुणे : बदललेल्या परिस्थितीत साखर उद्योगाला आधार देणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) २०२४-२५ हंगामासाठी रूपये ४१.६६ प्रति किलो करण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी ‘विस्मा’ने (वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.) केली आहे. एमएसपी न वाढवल्यास आगामी गाळप हंगाम घेणे आम्हाला शक्य होणार नाही, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.
यासंदर्भात ‘विस्मा’ने केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या भारतीय साखर उद्योगाला सतत पाठिंबा आणि विचार दिल्याबद्दल आम्ही भारत सरकार आणि तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आम्ही तुमचे तात्काळ लक्ष वेधून घेऊ इच्छितो की साखरेची एमएसपी 2018-19 हंगामासाठी 14 फेब्रुवारी 2019 रोजी 31 प्रति किलो अशी अधिसूचित केली होती, त्यानंतरच्या काळात उसाची एफआरपी रु. २७५ वरून 340 प्रति क्विंटल झाली आहे. आता साखर उत्पादनाचा प्रति किलो खर्च ४१.६६ रुपयांवर गेला आहे.
इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह फॅक्टरीज लिमिटेड यांनी संयुक्तपणे 04 सप्टेंबर 2024 रोजी भारत सरकारला हे सादर केले आहे.
महाराष्ट्र साखर हंगाम 2024-25 पुढील महिन्यात 15 नोव्हेंबर-2024 रोजी सुरू होत आहे. अनुकूल पावसामुळे 14 लाख हेक्टर क्षेत्रासह ऊस पिकाची स्थिती उत्तम आहे. महाराष्ट्र साखर उत्पादन अंदाजे 110 लाख टनापेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे, असे नमूद करून, पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रामुख्याने साखर उद्योगाला साखर विक्रीतून उत्पन्न मिळते आणि साखर S-30 ग्रेडचे सध्याचे बाजारभाव रु. 3500 ते 3550 प्रति क्विंटल आहेत. मर्यादित उठाव ही साखर कारखानदारांसाठी मोठी चिंता आहे. बँक साखरेच्या अधिसूचित एमएसपीनुसार तारण कर्ज देते. म्हणजे रु. ३१०० प्रति क्विंटल पेक्षा अधिक कर्ज मिळत नाही. ऊसाची ३४०० रु FRP आहे. म्हणजे एवढ्या तारण कर्ज रकमेतून एफ आर पी सुद्धा भागवली जाऊ शकत नाही.
साखर किंवा इथेनॉलचे दर आणि उसाचा दर यांचा काहीही ताळमेळ नाही. त्यात frp बिले १५ दिवसात देण्याचे बंधन आहे. FRP बिले वेळेत देण्यासाठी, साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) रु. 41.66 प्रति किलो करावी, अन्यथा आगामी गाळप हंगाम घेणे आम्हाला शक्य होणार नाही, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.