‘रावळगाव शुगर’कडून गळीत हंगामाचा मान महिलांना

नाशिक : साखर उत्पादन क्षेत्रात खूप जुना वारसा असलेल्या रावळगाव साखर कारखान्याने यंदा अभिनव मार्ग चोखाळत गळीत हंगाम सुरू करण्याचा मान महिला शक्तीला दिला. २१ महिलांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू करण्यात आला. ही वेगळी वाट राज्याच्या साखर क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे.
काळाच्या ओघात विविध अडचणींशी सामना करत रावळगाव कारखाना स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो प्रा. लि. च्या प्रयत्नामुळे पुन्हा सुरू झाला. कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड, संचालक कुंदन चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षी ट्रायल हंगामात सव्वा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यावर्षी महिलांच्या हस्ते हंगामाचा शुभारंभ झाला.
शेतात राबून ऊस उत्पादन करणाऱ्या महिलेला अध्यक्षांनी सन्मानाने मंचावर बसवून व इतर महिलांच्याच हस्ते गळिताचा शुभारंभ केला, असे गौरवोद्गार पूजा कराड (निफाड) यांनी काढले. शेतकऱ्यांनी लागवड वाढवून कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्नेहल दगडे यांनी प्रास्ताविक केले. वंदना गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक प्रवर्तक मंडळ कुटुंबांच्या हस्ते ऊस उत्पादक महिलांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
स्मिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कावेरी टिळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळासह कसमादे, खान्देश भागातील ऊस उत्पादक महिला, शेतकरी, ऊसतोड मुकादम, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.