महिला दिनी श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर विशेष कार्यक्रम

पाटेठाण: दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. त्यास अनुसरून या महिला दिनाच्या निमित्ताने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि.च्या कारखाना साईटवर सायं. ४.०० वाजता महिला दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी कारखाना कर्मचारी वसाहतीमधील तसेच कारखाना परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना सौ. सुमन रासकर म्हणल्या की, “आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देता-देता स्वत:कडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे पुढे जाऊन नुकसान होते. त्यासाठी आपण लवकरच जागृत झालो तर आपली शारीरिक, मानसिक व आर्थिक प्रगती नक्कीच होईल याची मला खात्री वाटते. प्रत्येक स्त्रीने आपले आरोग्य जपले पाहिजे” त्यासाठी योगसाधनेचे विविध प्रकार त्यांनी समजावून संगितले.
तसेच सौ. कविता कोरके यांनी “आजची स्त्री अबला नसून ती सबला आहे. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठे यश मिळवले आहे. उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, पी. व्ही. सिंधू यांसारख्या अनेक महिलांनी जगात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे जात आहे.” असे बोलत अनेक पौराणिक व आधुनिक दाखले देत महिलांची प्रगती सांगितली.
बर्याचवेळा आपल्याला औषध उपचारासाठी दवाखान्यावर फार मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो म्हणून प्रत्येक स्त्रीने स्व:ताच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकीने नियमित योगाभ्यास केला पाहिजे. दररोज उत्साही व आनंदमय जीवन जगण्यासाठी जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधून कारणाशिवाय आनंदी राहिले पाहिजे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. असे बोलून प्रत्येक स्त्रीला निरोगी राहण्याचे आवाहन सौ. संध्या शिंदे यांनी केले.
“जागतिक महिला दिन आपल्याला एक संदेश देतो की, महिलांचा सन्मान करा, त्यांना समान हक्क द्या आणि त्यांना पुढे जाण्यासाठी संधी द्या. समाजाची खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान स्थान मिळेल. ग्रामीण भागातील महिलेने केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता सर्व क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले पाहिजे. असे सौ. सुरेखा शेंडगे यांनी उपस्थित महिलांना सांगितले.
सौ. संगीता सोनवणे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, स्त्री ही विश्वाची जननी आहे. अवघे विश्व सांभाळण्याचे काम स्त्री करत असते. हे करताना स्वताकडे मात्र दुर्लक्ष करते. आजच्या महिला दिनानिमित्त आपण निरोगी राहण्याचा संकल्प करुयात. सर्व महिला आजच्या दिवसापासून निरोगी आयुष्य जगूया. नारीशक्ती ही खूप मोठी शक्ति आहे तिला समजून घ्या.
प्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांनी आवर्जून उपस्थित राहून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
यावेळी कारखान्यातील श्री. अशोक शेंडगे, श्री. दिनेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पल्लवी भुजबळ व सूत्रसंचालन सौ. मीरा मोरे यांनी केले तर आभार सौ. संगीता सोनवणे यांनी मानले.





