ऊसतोड कामगारांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे : न्या. महाजन
पुणे : ऊसतोड कामगारांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे, त्यांनाही ऊसतोड कामगार बनवू नये, असा सल्ला पुण्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी दिला.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, प्रादेशिक सहसंचालक पुणे व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमानाने पाटेठाण (ता. दौंड) येथे ऊसतोड कर्मचाऱ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी न्या. महाजन बोलत होते.
ऊसतोड कामगारांच्या मुलांमध्ये गुणवत्ता आहे. ऊसतोड कामगारांच्या सततच्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शाळेची हेळसांड होते. त्यामुळे पालकांनी जागरूक राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे मल्लिनाथ हरसुरे, साखर आयुक्त कार्यालयाचे मंगेश पितळे, नीलिमा गायकवाड, कामगार अधिकारी सविता छोत्रे, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाजन म्हणाले, ऊसतोड कामगारांनी आपले ओळखपत्र काढणे गरजेचे आहे. ऊसतोड मजुरांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या शासनाने पाच लाख रुपयांचा अपघाती विमा ऊसतोड मजुरांसाठी उपलब्ध करून दिला आहे. साखर कारखाना व शासनाच्या माध्यमातून सुमारे ८६ कोटी रुपये महामंडळाकडे उपलब्ध आहेत. महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे, या उद्देशाने राज्यात ८४ ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची सोय सुरू करण्याची प्रक्रिया आहे. ऊसतोड कामगारांनी आपल्या मुलांचे भवितव्य खराब करू नये.
प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील म्हणाल्या, कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण काम करीत असून, ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. एस. बी. टिळेकर यांनी सूत्रसंचालन केले. अशोक शेंडगे यांनी आभार मानले.