साखर दर निर्देशांक वाढीचा नवा उच्चांक
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढतच आहेत. मार्च २०२३ पासून साखरेच्या किमतीचा निर्देशांक 17.6 टक्क्यांनी वाढला, ही वाढ ऑक्टोबर 2011 नंतरची सर्वाधिक वाढ आहे.
भारत आणि चीनमधील ताज्या अंदाजात साखर उत्पादनात मोठी घट दाखवण्यात आल्याने निर्देशांक वधारला, असे विश्लेषण संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने (एफएओ) केले आहे.
‘एफएओ’ने जागतिक अन्नधान्य दर निर्देशांकामध्ये वाढ दर्शवली आहे. तृणधान्ये, डेअरी उत्पादने आणि वनस्पती तेलांच्या किमतीत घसरण झाली असली, तरी अन्नधान्य दर निर्देशांक चढाच राहिला. त्याचे कारण साखर, मांस, तांदूळ यामध्ये मोठी वाढ झाली, असे ‘एफएओ’चे म्हणणे आहे.
युक्रेन – रशिया युद्धाला तोंड फुटल्यानंतर, मार्च २०२२ पासून अन्नधान्याच्या किमती तब्बल २० टक्क्यांनी भडकल्या आणि तो दर कायम राहिला आहे.
या जागतिक संस्थेचा अंदाज बरोबर मानला, तर भविष्यात साखरेसह इतर अन्नधान्याचे दर चढेच राहतील, साखरेचे दर आणखी वाढतील, यात शंका नाही.