यशवंत कारखाना जमिनी विक्री : हायकोर्टाच्या संबंधितांना नोटिसा

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रस्तावित शंभर एकर जमीन हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती यांना विक्री करण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयाविरोधात बचाव कृती समितीच्या वतीने विकास लवांडे, लोकेश कानकाटे, सागर गोटे, राजेंद्र चौधरी, अलंकार कांचन या सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
जमीन विक्रीसंदर्भात दाखल तक्रारीवर प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांनी गंभीर दखल घेतली आहे. बचाव कृती समितीने सादर केलेल्या तक्रारीनुसार कारखान्यातील कारभार पारदर्शक नसल्याचे आरोप केला आहे. याचिकेत ‘यशवंत’च्या जमीन विक्री व्यवहारास स्थगिती मिळावी, अशी मागणी करण्यात केली आहे.
दरम्यान, हायकोर्टातील सुनावणीत बचाव कृती समितीतर्फे अॅड. माधव सोमण यांनी बाजू मांडली. कारखाना व्यवस्थापनातर्फे अॅड. शिवकुमार हंडाळे यांनी सुनावणीस हजेरी लावत, आपले लेखी म्हणणे सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीबाबतचा तारांकित प्रश्न आमदार उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अॅड. निरंजन डावखरे आणि डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, कारखान्याच्या जमिनींची तोट्यात विक्री करण्यासंदर्भात कारखान्याचे संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कारखाना बचाव समितीचे लवांडे यांनी म्हटले आहे की, सध्या हे प्रकरण न्यायालयात असून यासंदर्भात बाजार समिती आणि कारखान्याला नोटीस आल्या आहेत. त्यांचे वकील कोर्टात हजर असताना इकडे संचालक मंडळांनी खरेदी विक्रीचा व्यवहार केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे.