ऊसबील थकल्याने अक्कलकोटच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सोलापूर : कारखान्याकडे ऊसबील थकल्याने आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अक्कलकोट तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सुनील चिवडाप्पा कुंभार असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी याने विषारी द्रव्य प्राशन केले होते. सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, अक्कलकोट तालुक्यातील नागूर येथील सुनील चिवडाप्पा कुंभार (वय २८) या तरुण शेतकऱ्याचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ शुगर यांच्याकडे उसाचे बिल थकित आहे. त्याने मेंदर्गी येथील बँक ऑफ महाराष्ट्रमधून कर्जही घेतले होते. एकीकडे बँकेचा कर्ज भरण्यासाठीचा तगादा वाढला होता, तर दुसरीकडे उसाचे थकित बील मिळत नव्हते. या त्रासामुळे सुनील खूपच अस्वस्थ होता. हा त्रास सहन होत नसल्याने त्याने चार दिवसांपूर्वी चिठ्ठी लिहून विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांपासून त्याच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी त्याची प्राणज्योत मालवली.
सुनील कुंभार याच्या पश्चात वयोवृद्ध आई- वडील दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. घरातील एकलुता एक कर्ता युवकच गेल्याने कुंभार कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई मानसिक आजाराने त्रस्त आहे, तर वडिलांना वयोमानाने काम करता येत नाही. त्यामुळे घरची सर्वस्वी जबाबदारी सुनील याच्यावर होती.
….तोपर्यंत सुनीलचा मृतदेह ताब्यात घेणार नाही; गावकऱ्यांचा इशारा
संबंधित कारखाना आणि बँक अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, तोपर्यंत सुनीलचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. ही घटना समजतात धोत्री येथील गोकुळ शुगरच्या अधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.