शरयू ॲग्रोचे संचालक युगेंद्र पवार विवाह बंधनात, आत्या सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा विवाह तनिष्का कुलकर्णींसोबत आज (३० नोव्हेंबर २०२५) मुंबईत जिओ सेंटरमध्ये अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. या हाय-प्रोफाईल विवाह सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. युगेंद्र पवार यांनी अलीकडेच अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवली होती. दोन साखर कारखाने चालवणाऱ्या शरयू ॲग्रो इंडस्ट्रीजचे ते संचालक आहेत.
या विवाहसोहळ्यानिमित्त पवार कुटुंबातील प्रमुख सदस्य एकत्र आले होते. या महत्त्वाच्या समारंभाला राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेतेमंडळींनी हजेरी लावली. युगेंद्रचे सख्खे चुलते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थिती दिसून आली; मात्र ते नगर परिषद, नगर पंचायंतींच्या निवडणुकीमुळे प्रचारात असल्याने, उशिरा लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते खासदार सुप्रिया सुळे यांचा भन्नाट डान्स. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातही त्यांनी जोरदार नृत्य केले होते, तो व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता.

पवार कुटुंबातील उत्साही क्षण:
- लग्न सोहळ्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. युगेंद्र पवार यांच्या आत्याबाई असलेल्या सुप्रिया सुळे यांनी वरातीपुढे तुफान डान्स केला, ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आत्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपला नाही.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे युगेंद्रसोबत बग्गीमध्ये जल्लोष करताना दिसून आले.
- या सोहळ्याला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आणि महत्त्वाच्या व्यक्ती एकाचवेळी उपस्थित होत्या.
- अजित पवार यांचे संपूर्ण कुटुंब, त्यांची मातोश्री, तसेच पत्सुनी खा. सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार आणि जय पवार हेदेखील उपस्थित होते. जय यांची होणारी पत्नी ऋतुजा पाटीलदेखील उपस्थित होती.
- दरम्यान, लग्नाचा मुहूर्त टळला असताना, अजित पवार हे इंदापूरमधील सभा संपल्यानंतर माळेगाव नगरपंचायतीच्या सांगता सभेला हजेरी लावून रात्री उशिरा लग्नस्थळी पोहोचतील, असे सांगण्यात येत होते. सोहळ्याच्या मुख्य वेळी त्यांची अनुपस्थिती दिसून आली.
राजकीय मांदियाळी आणि चर्चा:
युगेंद्र पवार यांच्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने राजकीय आणि बॉलिवूडमधील दिग्गज मंडळींची मांदियाळी जमली होती.
- राज ठाकरे यांची उपस्थिती: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे हे या लग्न सोहळ्यातील एक लक्षणीय बाब ठरले. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याजवळ बसून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत चर्चाही केली.
- या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, कारण मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे महाविकास आघाडीत (MVA) सामील होणार का, अशी अटकळ बांधली जात आहे. राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि सरदेसाई हेही उपस्थित होते.
- प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील शरद पवारांच्या शेजारीच बसलेले दिसून आले.
याशिवाय, भाजपच्या पूनम महाजन, शायना एनसी, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजवर्धन पाटील आणि एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक उपस्थित होते.







