या शेयरनी दिला वर्षभरात 440 टक्क्यांचा नफा

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील शुगर स्टॉक्समध्ये (Sugar Stocks) मोठी तेजी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वांत मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या श्री रेणूका शुगर्स लिमिटेडचा शेअर गेल्या एक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न देत आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 440 टक्के नफा दिला.
बुधवारीही या शेअरमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. इंट्राडेमध्ये, हा शेअर 53.60 रुपयांवर पोहोचला. गेल्या एका महिन्यांत स्टॉक 40.27 टक्क्यांनी वाढला आहे. 21 मार्च 2022 रोजी त्याची किंमत 37.25 रुपये होती, जी आज 52.25 रुपये झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत श्री रेणूका शुगर लिमिटेडच्या शेअर्समध्ये 78 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2022 या वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 72% रिटर्न दिला आहे. स्टॉक सध्या त्याच्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या (Moving Average) वर बिझनेस करत आहे.
तुमच्या ‘ड्रीम होम’च्या निर्मितीचा खर्च वाढणार, एप्रिल महिन्यात सिमेंटच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
तेजी का?
बिझनेस टुडेमधील एका बातमी म्हटल्याप्रमाणे केअरएज रिसर्चच्या (CareEdge Research) अहवालानुसार, साखर उद्योगासाठी भारत सरकारद्वारे राबवण्यात येत असलेला इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (EBP) कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल. भारतातील अतिरिक्त साखरेची परिस्थिती कमी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अतिरिक्त साखर आणि उसापासून इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार साखर कारखान्यांना अनेक प्रकारे मदत करत आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने इथेनॉल प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या योजनांतर्गत कर्ज वाटपाची मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. 2025 पर्यंत 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं उद्दिष्ट गाठणं हे भारताचं ध्येय आहे.