एफआरपीपेक्षा दोनशे रूपये जादा द्या : राजू शेट्टी
स्वाभिमानीची १५ रोजी ऊस परिषद
शिरोळ : साखर कारखान्यांनी एफआरपी एक रकमी दिलीच पाहिजे, शिवाय इथेनॉलमुळे टनाला दोनशे रूपये जादा द्यावेत, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत पुढील रूपरेषा ठरवण्यात येणार आहे.
स्वाभिमानीची २१ वी राज्यव्यापी ऊस परिषद जयसिंगपूर येथे येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानिमित्त केलेल्या आवाहनात शेट्टी यांनी मागचे महाविकास आघाडी सरकार आणि आताचे युती सरकार दोघांवरही टीका केली आहे.
नव्या सरकारने महाविकास आघाडी सरकारचे सर्व निर्णय फिरवले; मात्र शेतकऱ्यांच्या विरोधातील जुने दोन निर्णय रद्द केले नाहीत. शेत जमिनीचे विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन झाल्यास, बाजारभावाच्या चौपट दर देण्याचा आणि एकरकमी एफआरपी देण्याचे पूर्वीचे निर्णय मविआ सरकारने बदलून दुप्पट दर आणि दोन टप्प्यात एफआरपी असे निर्णय घेतले होते. ते दोन्ही रद्द करून पूर्वीचे निर्णय कायम करावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली आणि येत्या ऊस परिषदेत हा मुद्दा धसास लावण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे.
मागच्या हंगामात सर्व कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन केले. त्यामुळे त्यांना अधिकचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन २०० रुपये एफआरपी व्यतिरिक्त अधिकचे द्यावेत, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे.
राजू शेट्टी यांचा व्हिडिओ
https://www.facebook.com/Rajushetti27/videos/2330474843777978