काय आहे आ. रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा वाद?

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू केल्यास संबंधित साखर कारखान्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच साखर आयुक्तालयाने जारी केले होते. मात्र बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड, (शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) या साखर कारखान्याने त्याआधीच गळीत हंगाम सुरू केल्याचा आरोप झाल्याने मोठी खळबळ माजली आहे.

कारण हा कारखाना राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा आहे. त्यातच कारखान्यांनी मनमानी करून नियमभंग केल्यास त्याविरुद्ध कार्यवाही करावी, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्यामुळे या प्रकरणाला कौटुंबिक वळणही मिळाले आहे.

MLC Ram Shinde
आ. राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देताना

बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडचे कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देऊन केली आहे.

शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे, की ‘शासनाच्या आदेशानुसार सन 2022-23 या चालू वर्षीच्या गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2022 पासून सुरू करावा, असा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत झालेला आहे. जे कारखाने गाळप हंगाम दिनांक 15 ऑक्टोबर पूर्वी गाळप सुरू करतील अशा कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व इतरांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या 19 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या सभेत देण्यात आलेले आहेत. 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी कारखाना सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन) आदेश, 1984 खंड 4 चा भंग होतो.तथापि, बारामती अ‍ॅगो लिमिटेड या साखर कारखान्याने या वर्षीचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पूर्वी सुरू करून कायद्याचा भंग केलेला आहे.

आमदार रोहित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू लागतात. राम शिंदे यांना हरवल्यापासून ते चर्चेत आले. मात्र अलीकडच्या काळात ते काही वादामुळेही चर्चेत आले होते. आता या ताज्या प्रकरणाला कौटुंबिक रंगदेखील दिला जात आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »