तनपुरे कारखान्याची निवडणूक लवकरच होणार

अहिल्यानगर : बंद पडलेल्या व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या राहुरीतील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याची प्रक्रिया २५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी राहुरीत कारखाना बचाव कृती समितीने मेळावा घेतला. समितीच्या न्यायालयीन संघर्षामुळेच कारखान्याचे अस्तित्व कायम राहिल्याचा दावा समितीचे संयोजक अमृत धुमाळ यांनी केला.
दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने कारखान्याची निवडणूक घेण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीत सुमारे २१ हजाराहून अधिक सभासदांची नावे आहेत. मात्र ही मतदार यादी केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी लावण्यात आली, याबद्दल कारखाना बचाव कृती समितीने मेळाव्यात संताप व्यक्त केला.