तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप शिल्लक
पुणे : यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी राज्यात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील 46 साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांच्या परवानगीने कारखाने बंद केले आहेत. मराठवाड्यातील उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर कारखान्यापर्यंत ऊस घेऊन यावा गाळप करुन दिला जाईल अशी भूमिका काही कारखान्यांनी घेतली आहे. मात्र, मुळात उसतोड कामगार आणि तोडीचा प्रश्न असल्याने हे शक्य होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पुणे : यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी राज्यात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील 46 साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांच्या परवानगीने कारखाने बंद केले आहेत. मराठवाड्यातील उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
ऑक्टोंबर महिन्यापासून यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला होता. हंगामाच्या सुरवातीपासून क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप हे साखर कारखान्यांनी केलेले आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी गाळपात घेतलेली आघाडी ही कायम ठेवली होती. त्यामुळे या विभागातील गाळप पूर्ण झाले असून 46 साखर कारखान्यांची धुराडी देखील बंद झाली आहे. वाढते क्षेत्र अन् अधिकचा उतारा यामुळे 1 हजार 220 लाख टन उसाचे गाळप करुन महाराष्ट्र साखर उत्पादनामध्ये देशात अव्वल स्थानी आहे.
उसतोड मजूर अन् वाहतूकीचा प्रश्न कायम
पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये यंदा अधिकची तोड ही हार्वेस्टरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र, मराठवाड्यातील क्षेत्र त्या तुलनेचे नाही. त्यामुळे या भागात उसतोड कामगारांकडूनच अधिकची तोड झाली आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात उसतोड कामगारांनीही परतीची वाट धरलेली आहे. त्यामुळे तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील हार्वेस्टर मागविले जात आहेत. ऊस गाळपासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे उसतोड कामगार हे फडात येण्यासाठीच तयार नाहीत. शिवाय तोडणी झालेला ऊस कारखान्यावर घेऊन जाणेही जिकिरीचे झाले आहे.