भारतातील पहिल्या साखर संग्रहालयासाठी निविदा निघाली
पुणे: साखर आयुक्त कार्यालयाजवळ ५ एकरांच्या जागेत भारतातील पहिले साखर संग्रहालय बांधण्यात येणार आहे. साखरेशी संबंधित वेदकाळापासूनच्या गोष्टी व साखर कारखान्याची प्रत्यक्ष प्रतिकृती, साखर या विषयावरच्या जगभरातील पुस्तकांचे संदर्भ ग्रंथालय हे या चारमजली साखर संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, त्या ५ एकरांच्या जागेत संग्रहालय कसे असेल, याचे डिझाइन सादर करण्याची निविदा प्रसिद्ध झालेली आहे. १७ जूनपर्यंत निविदेची मुदत असून, अशा प्रकारचे काम करणाऱ्या देश-परदेशातील कंपन्यांकडून निविदांना प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.राज्य सरकारने संग्रहालयाच्या कामासाठी म्हणून सध्या ४० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. त्याचा संकल्पीत आराखडा तयार आहे.
ते म्हणाले, अशा प्रकारच्या संग्रहालयाची कल्पना सरकारकडे प्रस्तावित केल्यानंतर त्यासाठी लगेच मंजुरी मिळाली. भारतात कुठेही असे संग्रहालय नाही. साखर आयुक्त कार्यालय पुण्यात असल्यामुळे ते पुण्यातचे करणे योग्य होते. संग्रहालय पूर्ण होईल, त्यावेळी त्याच्या रूपाने पुणे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.