यंदा ८० लाख टन निर्यातीस परवानगी द्या : इस्मा


नवी दिल्ली – यावर्षी साखर उत्पादनात होणारी मोठी वाढ लक्षात घेऊन, किमान ८० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘ईस्मा’ने (इंडियन शुगर मिल्स असो.) केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेने केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना दिले आहे. इस्माचे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी ही माहिती दिली. इस्मा ही साखर कारखानदारांची शिखर संघटना आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यावर्षी देशभरात ऊस लावगडीचे क्षेत्र वाढले आहे, त्यात अपवाद वगळता बहुंताशी राज्यात पर्जन्यमान चांगले असल्याने उसाचा उताराही चांगला मिळण्याची शक्यता आहे. इथेनॉल निर्मितीसाठी जाणारी साखर गृहीत धरल्यास यावर्षी किमान ४०० लाख टन साखरेचे देशात उत्पादन अपेक्षित आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात हेच उत्पादन ३९४ लाख टन झाले होते.
यावर्षी एकूण साखर उत्पादनापैकी ४५ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी जाईल, गेल्यावर्षी यासाठी ३४ लाख टन साखर वापरण्यात आली होती. यावर्षी देशात ३५५ लाख टन साखर उत्पादन शक्य आहे. देशांतर्गत २७५ लाख टन साखरेची गरज आहे. हा हिशेब करता किमान ८० लाख टन साखर निर्यातीसाठी उपलब्ध होऊ शकते.
जेवढी जास्त साखर निर्यात होईल तेवढ्या प्रमाणात देशांतर्गत साखरेचे स्थिर रहाणार आहेत. त्याचा फायदा साखर उद्योगाला होऊ शकतो. त्यातून शेतकऱ्यांची थकीत आणि चालू वर्षीची एफआरपीची रक्कम कारखान्यांना देणे शक्य होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या साखर निर्यातीचे धोरण लवकर जाहीर झाल्यास त्यानुसार कारखान्यांनाही निर्यात साखरेचे कंत्राट घेणे लवकर शक्य होणार आहे. या सर्व बाबींचा विचार साखर निर्यातीचे धोरण ठरवताना करावा.