राजगड साखर कारखान्यासाठी 29 मे ला मतदान होणार
पुणे : पुण्यातील भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2022-27 हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. 17 संचालक निवडीसाठी हा निवडणूककार्यक्रम जाहीर झाला आहे. 29 मेला यासाठी मतदान होणार आहे. तर 31 मेला मतमोजणी आणि निकाल घोषित करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी भोर यांच्या कार्यालयात 25 ते 29 एप्रिल या काळात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मिळणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज शुल्क 100 रुपये भरावे लागणार आहे. खुल्या आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना 2 हजार रुपये, अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना 500 रुपये इतकी निवडणूक अनामत जमा करावी लागेल.
छाननी 2 मेला
मिळालेल्या नामनिर्देशनपत्रांची यादी त्या त्या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याची छाननी 2 मेला सकाळी 11 वाजल्यापासून प्रसिद्ध करण्यात येईल. जे अर्ज ग्राह्य होतील, त्याची यादी 4 मेला निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी भोर विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
5 ते 18 मे काळात मागे घेता येणार
उमेदवारांना अर्ज 5 ते 18 मे या काळात मागे घेता येतील. निवडणूक चिन्हाचे वाटप 19 मेला होणार आहे. मतदान 29 मेला होऊन मतमोजणी आणि निकाल 31 मेला घोषित करण्यात येईल.