‘विठ्ठल’चा ३५०० रु. दर : अभिजित पाटलांची घोषणा
सोलापूर : सरकारकडून भरघोस मदत मिळालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आगामी हंगामासाठी ३५०० रूपये एवढ्या विक्रमी ऊस दराची घोषणा करून साखर उद्योगात खळबळ उडवून दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचे टायमिंग त्यांनी साधल्याची चर्चा आहे. कारखान्याच्या रोलर पूजा कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावी वाटचालीचे संकेत दिले. पाटील यांच्या घोषणेनंतर शेतकरी सुखावला आहे.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, की गतवर्षी कारखान्याने यशस्वीपणे गाळप हंगाम पार पाडला. मागील हंगामात सभासदांना तीन हजार रुपये ऊसदर दिला आहे. यंदा कारखान्याची गाळप क्षमता वाढणार आहे. दररोज किमान दहा हजार टनाने गाळपाला सुरवात होईल. सध्या सगळे सुरळीत सुरू आहे. येणाऱ्या हंगामात ३ हजार ५०० रुपये भाव दिला जाणार आहे.
या कारखान्याचा २०२४-२०२५ हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प. भगवंत महाराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी चेअरमन पाटील बोलत होते. ह.भ.प.श्री भगवंत महाराज चव्हाण म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना हा पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा आहे. तो चालला तरया तालुक्याचे अर्थकारण बदलते. या कारखान्याला लाभलेले नेतृत्व हे विठ्ठल कारखान्यास गतवैभव मिळवुन देणारे आहे, यात कोणतीही शंका नाही. मागील दोन वर्षापासून बंद असलेला कारखाना पाटील उत्तम प्रकारे चालवित आहेत व यापुढेही कारखान्याच्या सभासदांना न्याय देतील.
कार्यक्रम प्रसंगी दत्तानाना नागणे, रामनाना वाघ, वाय. जी. भोसले, बी. पी. रोंगे, व्हा. चेअरमन प्रेमलता रोंगे, संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, कार्यकारी संचालक आर. बी. पाटील उपस्थित होते.
अभिजित पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. माढा मतदारसंघामध्ये विठ्ठल कारखान्यासह तालुक्यातील ४२ गावांचा समावेश आहे. तर माळशिरस तालुक्यातील १४ गावे देखील याच मतदारसंघात समाविष्ट आहेत. त्यामुळे अभिजित पाटील यांनी या भागात मोठी ताकद लावली आहे.
माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. राज्यात आणि देशात सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन करण्याचा विक्रम शिंदे साखर कारखान्याने केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन साखर सम्राटांमध्ये चुरशीची लढत होणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू केला. सध्या तो सुस्थितीमध्ये आला आहे. गतवर्षीच्या हंगामामध्ये तब्बल 10 लाख 81 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करीत पाटील यांनी सर्वाधिक तीन हजार रुपयांचा ऊसदर दिला आहे. पाटील यांनी एकरकमी ऊसदर देण्याची परंपरा सुरू केल्याने जिल्ह्यातील अन्य साखर कारखानदारांना देखील अधिकचा ऊसदर द्यावा लागत आहे. ऊसदराची स्पर्धा सुरू झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत ऊसदराचा मुद्दा देखील चर्चेत राहणार आहे.