सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार

हिंगोली: सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कारभार करणाऱ्या संस्थांना राज्य शासनाकडून सहकार महर्षी, सहकार भूषण आणि सहकार निष्ठ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
नविन सुधारित कार्यक्रमानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील चांगला कारभार केलेल्या सहकारी संस्थांनी आपले पुरस्कारासाठीचे प्रस्ताव ज्या तालुक्यात त्यांचे मुख्यालय आहे त्या तालुक्याचे सहायक निबंधक, उपनिबंधक यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले. राज्यातील ४५ संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातून प्रथम एक लाखांचा पुरस्कार सहकार महर्षी हा पात्र संस्थेस देण्यात येणार आहे. द्वितीय पुरस्कारात सहकार भूषण हा असून तो राज्यातील २१ संस्थांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये, स्मृती
चिन्ह व प्रशस्तीपत्रक असेल. तृतीय सहकार निष्ठ हा पुरस्कार २३ संस्थांना देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप रूपये २५ हजार रकमेचा धनादेश, स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक आहे.
पुरस्कारासाठी संस्थेची नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखा परीक्षण, लेखापरीक्षण दोषदुरूस्ती अहवाल, निवडणूक, व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक, प्रशिक्षण व प्रतिज्ञापत्रे आदीसाठी ५० गुण, संस्था प्रकारनिहाय निश्चित केलेल्या विशिष्ट निकषांसाठी ३५ गुण व सहकारी संस्थेसाठी योगदान, जनतेसाठी दिलेले योगदान, सहकार चळवळीच्या विकासासाठी केलेले प्रयत्न, सहकार, सार्वजनिक व धर्मदाय प्रयोजनसाठी केलेली मदत यासाठी १५ गुण देण्यात येणार असल्याचे सुरेखा फुपाटे यांनी सांगितले.






