खळबळजनक : ७० लाखांच्या थकबाकीतून ऊसतोड मुकादमाचे अपहरण

धारूर: कामगारांच्या थकबाकीच्या वादातून एका ऊसतोड मुकादमाला साखर कारखान्याच्या लोकांनी पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथील दादासाहेब बडे असे अपहरण झालेल्या मुकादमाचे नाव असून, या घटनेमुळे ऊसतोड कामगार आणि मुकादमांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलीस पथक संबंधित साखर कारखान्यात जाऊन चौकशी करत असून, हा खरोखर अपहरणाचा प्रकार आहे की आर्थिक व्यवहारातील अन्य काही गुंता, याचा शोध घेतला जात आहे. अद्याप दादासाहेब बडे यांचा पत्ता लागलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
नेमकी घटना काय?
तक्रारदार : पीडित मुकादमाचे वडील शामसुंदर बडे यांनी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोप : कोल्हापूर जिल्ह्यातील आटणी (Atani) येथील एका साखर कारखान्याशी संबंधित लोकांनी २६ जानेवारी रोजी दादासाहेब बडे यांना जबरदस्तीने उचलून नेले.
वादाचे कारण : दादासाहेब यांनी कारखान्याला मजूर पुरवण्यासाठी सुमारे ७० लाख रुपयांची उचल घेतली होती. यातील काही रक्कम थकीत राहिल्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचा संशय आहे.
कामगारांबरोबरच मुकादमही असुरक्षित
या घटनेमुळे थकबाकी, मजुरी व कंत्राटी कामगारांच्या व्यवहारात कायद्याचे भय उरले आहे का? असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. पैशाच्या वादातून थेट मुकादमाच्याच अपहरणासारखे प्रकार घडत असतील, तर सामान्य कामगारांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कामगार संघटना व नागरिकांकडून होत आहे.






