साखरेचे दर वधारले: ४ हजारांचा टप्पा ओलांडला!

पुणे : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी साखरेचा कोटा जाहीर केल्यानंतर बाजारपेठेत साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत कोटा कमी असल्याने आणि यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने घाऊक बाजारात साखरेचे दर ४,००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत.
केंद्र सरकारने फेब्रुवारीसाठी २२.५० लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मात्र, हा कोटा अपुरा वाटत असल्याने कारखान्यांच्या निविदा दरात १०० रुपयांची वाढ होऊन तो ३,६५० रुपयांवर गेला आहे. घाऊक बाजारात S-30 ग्रेड साखरेचा दर जो आधी ३,९०० ते ३,९५० रुपये होता, तो आता वाढून ४,००० रुपयांच्या पार गेला आहे.
दरम्यान, मागील काळात विना-जीएसटी साखरेच्या विक्रीमुळे दर दबावात होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या बेकायदेशीर साखरेवर कारवाई करण्याची मागणी केली होती, परंतु सध्याच्या मागणीमुळे दराने पुन्हा उसळी घेतली आहे. बाजारातील जाणकारांच्या मते, लग्नसराई आणि सण-उत्सवांमुळे साखरेची मागणी वाढणार असल्याने येत्या काळात दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे
हंगाम समाप्तीकडे: महाराष्ट्रातील २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम आता संपत आला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील बहुतांश कारखाने बंद होण्याची शक्यता असल्याने साखरेची आवक घटणार आहे.






