सामाजिक बांधिलकी : ‘कृष्णा’चा ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाला आधार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कराड : पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने मायेचा हात पुढे केला आहे. कारखान्याने आपल्या परिसरातील चार ‘साखर शाळां’मधील २६५ विद्यार्थ्यांना मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

बीड, जालना, धाराशिव, परभणी आणि सोलापूर यांसारख्या दुष्काळी पट्ट्यातून आलेल्या मजुरांच्या कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे. शिक्षणासोबतच या मजुरांच्या कुटुंबांसाठी कारखाना वेळोवेळी आरोग्य शिबिरे व इतर कल्याणकारी उपक्रमही राबवत आहे. या उपक्रमामुळे ऊसतोडणीच्या हंगामी कामातही मजुरांच्या मुलांच्या हातातली पाटी आणि लेखणी कायम राहणार आहे.

शिक्षणाचा प्रवाह कायम: ऊसतोड मजूर ६ महिने आपल्या गावापासून दूर असतात, ज्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण सुटण्याची भीती असते. ही दरी भरून काढण्यासाठी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या साखर शाळा चालवल्या जात आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »