धाराशिव जिल्ह्यात ३५० एकरावरील ऊस जळून खाक

धाराशिव । शुगरटुडे
भूम-परांडा तालुक्यांच्या सीमेवरील साकत आणि अंतरगाव शिवारामध्ये लागलेल्या भीषण आगीत सुमारे साडेतीनशे एकर ऊस जळून खाक झाला, अशी माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली. तोडणीला आलेल्या ऊसाची राख झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच परिसरातील केळी बागाही जळाल्या. आधीच दुष्काळाच्या झळा, त्यात या आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
साकत गाव परांडा तालुक्यात, तर अंतरगाव भूम तालुक्याच्या हद्दीमध्ये येते. काल दुपारी अचानक एका उसाच्या फडाला आग लागली आणि उष्ण हवामान, तसेच जोऱ्याच्या वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली. त्यात सुमारे शंभर शेतकऱ्यांचा ३५० एकरवर ऊस जळाला, अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकरी बाबूराव गोरे यांनी दिली. त्यांचा स्वत:चा दीड एकरपेक्षा अधिक ऊस जळाला आहे.
शेतातील ठिबक सिंचन संच, सौरऊर्जा युनिट, पाइप, मोटारी असे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र मंगळवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणीही नुकसानग्रस्त भागाला भेट दिली नाही, असे गोरे यांनी सांगितले. नाही म्हणायला जिल्हा परिषदेचे काही लोक येऊन गेले होते. मात्र महसूल विभाग, मदत व पुनर्वसन विभाग यांचे कोणीही आले नव्हते. अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने हजर होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वाऱ्यामुळे प्रयत्न अपुरे पडले, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. आगीचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(आगीचे तांडव पाहा खालील व्हिडिओ मध्ये)






