कर्नाटकात प्रतिटन ३,६०० रुपयांचा दर मान्य

बेळगावमधील ऊसदर आंदोलन मागे
बेळगाव : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जाहीर केलेला प्रतिटन ३,६०० रुपयांचा दर शेतकरी नेत्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी संघटनांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. प्रतिटन ५,५०० रुपयांचा दर मिळाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. मागणीसाठी हत्तरगी टोलनाक्यापासून बेळगावच्या दिशेने पदयात्रा काढण्यात आली होती.
पदयात्रेदरम्यान आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू करून मुक्तीमठ परिसरात ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलनाला वेगळे वळण मिळाले.
पालकमंत्र्यांनी प्रतिटन ३,६०० रुपये दर जाहीर केला होता; मात्र शेतकरी संघटनांनी सुरुवातीला त्याला प्रतिसाद दिला नव्हता. शासनाने प्रतिटन एक हजार रुपये अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशीही मागणी करण्यात आली होती. शासन आणि शेतकरी नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ३,६०० रुपयांचा दर स्वीकारण्याचा निर्णय झाला. या दरानुसार साखर कारखान्यांशी करार करण्याची भूमिका शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी मांडली.






