ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये देण्यासाठी किसान सभेचे निवेदन

गडहिंग्लज : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन किमान पाच हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले.
ऊस पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना बारा ते अठरा महिने मोठा भांडवली खर्च करावा लागतो. वाढती मजुरी, खते, औषधे, सिंचन आणि तोडणी-वाहतुकीच्या खर्चामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, असे निवेदनात म्हटले आहे.
शासनाने ऊसदर निश्चित करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा. साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च तसेच साखर, बगॅस, मळी, प्रेसमड, इथेनॉल आणि सहवीज यांपासून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची माहिती सार्वजनिक करावी. उपपदार्थांमधून मिळणाऱ्या नफ्यात शेतकऱ्यांना योग्य वाटा मिळण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करावेत, अशी मागणीही करण्यात आली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक विश्लेषणाच्या आधारे कारखानानिहाय उत्पादन खर्चाचा अभ्यास करून ऊसदर निश्चित करावा आणि यासाठी शेतकरी संघटनांची बैठक बोलवावी, असे निवेदनात नमूद आहे. तसेच ऊस वाहतुकीचा खर्च २५ किलोमीटरपर्यंत मर्यादित धरावा, तोडणी-वाहतूक यंत्रणेकडून होणारे शोषण थांबवावे आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७२ रुपये करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.






