साखर कारखान्यांनी पाणी पुनर्वापराकडे खर्च नव्हे, तर गुंतवणूक म्हणून बघावे : सहकारमंत्री पाटील यांचे आवाहन

आवडल्यास ही बातमी शेअर करा


पुणे | शुगरटुडे

– निसर्गाने उसाला एक विलक्षण देणगी दिली आहे. ऊस हे केवळ साखरेचे पीक नसून ते स्वतः पाण्याचे एक जिवंत भांडार आहे. एका उसाच्या वजनात तब्बल ७० टक्के पाणी असते. गाळपाच्या प्रक्रियेत इव्हॅपोरेटर्स आणि स्टीम कंडेन्सरमधून हे पाणी वाफेच्या रूपात बाहेर पडते आणि थंड झाल्यावर शुद्ध कंडेन्सेट पाण्याचा मोठा प्रवाह तयार होतो. त्यामुळे कारखान्यांच्या संचालक मंडळांना माझे सांगणे आहे की, पाणी पुनर्वापराकडे खर्च म्हणून न पाहता ती तुमच्या भविष्यातील नफ्याची आणि सुरक्षेची गुंतवणूक आहे, असे त्याकडे बघावे. शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक तरतुदींमधून जलसुरक्षा, सीपीयू आणि आधुनिक ईटीपी प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज (2 नोव्हेंबर ) केले.


सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा यंत्र अभियांत्रिकी विभाग, साखर आयुक्तालय, पुणे आणि इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (पश्चिम क्षेत्र) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘साई नॉन-कन्व्हेन्शनल एनर्जी नाशिक’ यांच्या सहकार्याने आज आयोजित ‘साखर आणि इथेनॉल उद्योगांमधील बाष्पीभूत पाण्याची पुनर्प्राप्ती, पुनर्वापर आणि जलसुरक्षा’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या  राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन  राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी (डावीकडून) डॉ. नागेश चौगुले, स्मिता इघे, प्रा. सुनिल भिरूड, डॉ. संजय कोलते, बाबासाहेब पाटील, दिलीप पाटील, डॉ. अतुल खराटे आणि डॉ. एस. एस. परदेशी


सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मीनी ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनिल भिरूड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडू पाटील, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष डॉ. अतुल खराटे, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या पश्चिम क्षेत्राचे संचालक दिलीप पाटील, ‘साई नॉन-कन्व्हेन्शनल एनर्जी नाशिक’च्या संचालिका स्मिता इघे आणि या परिषदेचे निमंत्रक सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. नागेश चौगुले उपस्थित होते.


यावेळी बोलताना राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, गेल्या काही वर्षांत इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे. पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणामुळे देशाचे परकीय चलन वाचत आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्त पडत आहेत, याचा सहकार मंत्री म्हणून मला सार्थ अभिमान आहे. परंतु जसा इथेनॉलचा विस्तार होतो आहे, तशीच पाण्याची गरजही वाढते आहे. हरित ऊर्जा (Green Fuel) तयार करताना आपण ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण करू शकत नाही. म्हणूनच डिस्टिलरीमध्ये स्पेंटवॉश बाष्पीभवन (MEE), कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट (CPU) आणि झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) मानकांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.

परिषदेत मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. नागेश चौगुले, दिलीप पाटील, डॉ. अतुल खराटे, डॉ. संजय कोलते, प्रा. सुनिल भिरूड आणि स्मिता इघे.

राज्यातील शेतकऱ्याकडे आपण अन्नदाता म्हणून पाहतो. मात्र, आता त्यावरच थांबून न राहता इंधनदाता म्हणून देखील शेतकऱ्याचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. कृषी क्षेत्राततून उपपदार्थांची निर्मिती करणे ही काळाची गरज असून त्यासाठी आधुनिक पध्दतीने पाण्याचा वापर करणे देखील आवश्यक आहे. ऊसाची शेती आणि साखर उद्योग या दोन्हीचा थेट संबंध त्यासाठी लागणाऱ्या पाण्याशी असल्याने साखर आणि इथेनॉल उद्योगांमधील बाष्पीभूत पाण्याची पुनर्प्राप्ती, पुनर्वापर आणि जलसुरक्षा हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. यासाठी राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेतला आणि राज्याचे साखर आयुक्तालय त्यांना सहकार्य करीत आहे, हे निश्चितच स्वागतार्ह बाब आहे.


यावेळी बोलताना राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते म्हणाले की, यंदा राज्यावर दुष्काळाची छाया असून उपलब्ध असलेल्या पाण्याची बचत आणि त्याचा पुनर्वापर करून आपण सगळ्यांनीच या परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नांना पूरक असे सहकार्य करण्यासाठी आजच्या परिषदेत विचारमंथन होणार आहे. साखर आणि इथेनॉल उद्योगांमधील बाष्पीभूत पाण्याची पुनर्प्राप्ती आणि पुनर्वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून त्यासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठासारख्या संशोधन संस्थांची मदत घेतली जात आहे.


यावेळी  कुलगुरू प्रा. सुनिल भिरूड म्हणाले की, सध्याच्या काळात केवळ साखर उद्योगानेच नव्हे, तर जास्त पाण्याचा वापर लागणाऱ्या सेमी कंडक्टर आणि डाटा सेंटरसारख्या उद्योगांनी पाणी बचतीच्या संदर्भात वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान परस्परांना करणे आवश्यक आहे.


यावेळी बोलताना संभाजी कडू पाटील म्हणाले की, ऊस शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा वापरही कमी झाला पाहिजे. ठिबक सिंचनासह मायक्रो-इरिगेशन आणि पाणी बचतीच्या आधुनिक पद्धती वापरण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे.
यावेळी डॉ. अतुल खराटे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाव्दारे या परिषदेचे निमंत्रक सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. नागेश चौगुले यांनी परिषद आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीतम सेलमोकर आणि रूपाली सेवाने यांनी केले. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या पश्चिम क्षेत्राचे संचालक दिलीप पाटील यांनी आभार मानले.


सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनिल भिरुड तसेच या राष्ट्रीय परिषदेचे जनरल चेअर आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.एन. सोनावणे आणि जनरल चेअर तसेच अधिष्ठाता प्रा. पराग सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »