उसाला ५,५०० रुपये दरासाठी बंद; बेळगाव, चिकोडीत शेतकऱ्यांचा एल्गार

बेळगाव, चिकोडी : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदचे शनिवारी (दि. ३१) बेळगाव जिल्ह्यात पडसाद उमटले. चिकोडी शहरासह उपविभागातील अनेक गावांमध्ये दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर आंदोलक शेतकऱ्यांनी बसवाहतूक रोखली. काही महिला आणि पुरुष आंदोलक रस्त्यावर आडवे झोपल्याने त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता रोकोला प्रशासनाने बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांकडे मोर्चा वळवला. जिल्ह्यात काही ठिकाणी बैलगाड्या लावून रस्ते बंद करण्यात आले.
चिकोडी शहरासह उपविभागातील तालुके आणि ग्रामीण भागात बंदला प्रतिसाद मिळाला. सकाळपासून विविध गावांमध्ये रस्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील बोरगाव, बेडकिहाळ, कागवाड, एकसंबा आणि सदलगा परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. बंदमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचीही गैरसोय झाल्याचे दिसून आले.
शेतकरी संघटनांच्या आवाहनाला नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. अनेक गावांमध्ये दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागात शुकशुकाट जाणवत होता.
चिकोडी शहरातील बसव सर्कल येथेही रस्ता रोको करण्यात आला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावरील टोलनाक्यांजवळही शेतकऱ्यांनी आंदोलन केले. चिकोडीतील आंदोलनाला शहरातील बार असोसिएशनने पाठिंबा दिला.






