उसाला ४,५०० रुपयांचा दर द्या; मंगळवारी चक्का जामचा इशारा

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ४,५०० रुपये दर विनाकपात मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यासह सीमाभागात सकाळी अकरा वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, “दीड महिन्यापासून ऊसदरासाठी आंदोलन सुरू आहे. त्यातून केवळ एमएसपी निश्चित करण्याचे काम झाले. मात्र, मुख्यमंत्री आणि शासनाला या आंदोलनाचे गांभीर्य नाही. जगात आणि देशात साखरेचा तुटवडा असून, नवीन साखर निर्माण झाल्याशिवाय पुरवठा वाढणार नाही. या परिस्थितीचा फायदा घेऊन साखर कारखाने शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
कर्नाटकातही अनेक आंदोलने झाली असून तेथील मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांच्या आंदोलनाचे गांभीर्य सरकारला दिसत नसल्याची टीका शेट्टी यांनी केली. ज्या ठिकाणी कारखाने सुरू आहेत, तेथे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते छावण्या टाकून तळ ठोकतील, असेही त्यांनी सांगितले.
आंदोलनाची रूपरेषा
किणी टोलनाक्यावर सकाळी अकरापासून आंदोलन सुरू होईल. कोगनोळी आणि नागठाणे (जि. सातारा) येथेही स्थानिक पदाधिकारी व शेतकरी रास्ता रोको करतील. ४,५०० रुपये दराची घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.






