राष्ट्रीय सहकारी बँकिंगमध्ये महाराष्ट्राला प्रतिनिधित्व; विद्याधर अनास्कर नॅफस्कॉबवर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्य सहकारी बँकांची राष्ट्रीय शिखर संघटना असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेडच्या (नॅफस्कॉब) संचालकपदी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आणि बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड झाली आहे. २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे.

नॅफस्कॉबच्या २१ संचालकपदांसाठी एकूण २२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, छत्तीसगड राज्य सहकारी बँकेच्या प्रतिनिधीने उमेदवारी मागे घेतल्याने २१ जागांसाठी २१ उमेदवार शिल्लक राहिले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनास्कर यांच्यासह सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर केली.

अनास्कर यांना सहकार, बँकिंग प्रशासन, आर्थिक व्यवस्थापन आणि बँकिंगविषयक कायदे या क्षेत्रांतील चार दशकांहून अधिक अनुभव आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे निव्वळ मूल्य ५ हजार ७६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी दिली.

ग्रामीण पतपुरवठ्यात नॅफस्कॉबची भूमिका

नॅफस्कॉब ही राज्य सहकारी बँकांची संघटना असून, देशातील सहकारी पतपुरवठा व्यवस्थेच्या विकासात तिची महत्त्वाची भूमिका आहे. ग्रामीण सहकारी पतपुरवठा व्यवस्थेत राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि शेतकऱ्यांना थेट पतपुरवठा करणाऱ्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था यांचा समावेश होतो.

या संस्थांच्या अडचणी, अपेक्षा, धोरणात्मक प्रश्न आणि विकासाच्या संधी नॅफस्कॉबच्या माध्यमातून केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि नाबार्डसमोर मांडल्या जातात. अनास्कर यांच्या निवडीमुळे राष्ट्रीय सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »