साखरेचा शिल्लक साठा घटला; दिवाळीच्या तोंडावर दरात तेजी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख टनांचा कोटा खुला

पुणे : मागील हंगामाच्या अखेरीस साखरेचा शिल्लक साठा कमी असल्याने आणि नव्या हंगामातील उत्पादन अद्याप मर्यादित असल्याने साखरेच्या दरात तेजी कायम आहे. घाऊक बाजारात एस-३० ग्रेडच्या साखरेचा दर प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वाढून ५,५०० रुपयांवर स्थिरावला आहे.

केंद्र सरकारने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. दिवाळीत मागणी वाढल्यास दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात ऊस गाळप हंगाम सुरू झाला असला, तरी कारखाने अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत.

देशाच्या एकूण साखर उत्पादनात या तीन राज्यांचा मोठा वाटा आहे. दिवाळीनंतर गाळपाचा वेग वाढण्याची आणि ऊसतोडीसाठी कामगारही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये तयार झालेली नवीन साखर नोव्हेंबरमध्ये विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारातील आवक आणि साठा गरजेइतका असला, तरी सध्या ग्राहकांची वाणवा आहे. महिनाअखेरमुळे मागणी कमी असल्याचे सांगितले जात आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने साखरेची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या कारखान्यांच्या निविदांमधून साखरेची विक्री प्रतिक्विंटल ५,००० ते ५,१०० रुपये दराने होत आहे. मागणी वाढल्यास या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.

दिवाळीत दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जाण्याची अपेक्षा आहे. पुढील काळात साखरेचे दर किती वाढतात, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »